स्वच्छता, पाणी प्रश्नी विशेष सभा बोलवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST2021-04-02T04:34:11+5:302021-04-02T04:34:11+5:30

कळंब : शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्यामुळे व अस्वच्छतेमुळे वातावरण दूषित झाले आहे. त्यातच कोरोना काळात न. प. मार्फत ...

Sanitation, water issues should be called a special meeting | स्वच्छता, पाणी प्रश्नी विशेष सभा बोलवावी

स्वच्छता, पाणी प्रश्नी विशेष सभा बोलवावी

कळंब : शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्यामुळे व अस्वच्छतेमुळे वातावरण दूषित झाले आहे. त्यातच कोरोना काळात न. प. मार्फत दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराची स्वच्छता व पाणी प्रश्नावर न. प. ची विशेष सभा बोलवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, शहराच्या अनेक भागांत न. प.च्या नियोजनाभावी स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. अस्वच्छता वाढल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील नळाला गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त आणि पिवळे पाणी येत आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासन याची दखल घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

शुद्ध पाणी मिळण्यासाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी पाणी फिल्टर मशीन (ए. टी. एम.) बसवण्यासाठी शेड उभे केले आहेत; परंतु त्यात अद्यापही पाणी सोडलेले नसल्याने हे शेड म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छता व पाणीप्रश्नांवर विशेष सभा बोलावून त्या सभेला प्रत्येक प्रभागातील जाणकार नागरिकांनाही बोलावण्यात यावे, अशी सूचना न. प. मुख्याधिकाऱ्यांना द्यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर शिवसेनेचे गटनेते शिवाजी कापसे, नगरसेवक मुस्ताक कुरेशी, मीरा चोंदे, अनंत वाघमारे, अश्विनी शिंदे, सुरेखा पारख, सतीश टोणगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Sanitation, water issues should be called a special meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.