सांगली अर्बनचे सहा कोटी जप्त

By Admin | Updated: November 15, 2016 00:24 IST2016-11-15T00:11:15+5:302016-11-15T00:24:27+5:30

तुळजापुरात कारवाई : हजार, पाचशेसोबत शंभराच्याही नोटा

Sangli Urban's six crore seized | सांगली अर्बनचे सहा कोटी जप्त

सांगली अर्बनचे सहा कोटी जप्त

उस्मानाबाद : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाने सांगली अर्बन बँकेचे सहा कोटी रुपये सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तुळजापुरात जप्त केले. चौकशीत या पैशाबाबत बँकेच्या संबंधितांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने रात्री उशिरा ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवर स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. पथक सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तुळजापूर बायपासवर वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी एक जीप (क्र. एमएच १०/ बीएम ३१२७) पथकापासून काही अंतरावर रेंगाळत असल्याचे निदर्शनास आल्याने पथकातील अधिकाऱ्यांना संशय आला. पथकाने सांगली अर्बन को-आॅप. बँक असे दर्शनी भागावर नाव असलेल्या जीपची तपासणी केली असता त्यामध्ये सहा सिमेंटच्या गोण्यांमध्ये एक हजार, पाचशेसह इतर रुपयांच्या नोटा भरल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती तातडीने पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना दिली. यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन गाडी तसेच नोटांच्या गोण्यांचा पंचनामा केला. जीपमधील पैशांची मोजणी करण्याकरिता चार मशिन्स व कर्मचारी मागविण्यात आले. यावेळी पोलिसांनी जीपसोबत असलेल्या व्यक्ती रवींद्र भोसले, माणिक सौंदडे आणि आळवेकर यांना विचारले असता त्यांनी आपण बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच ही रक्कम परभणी व माजलगाव शाखेतील प्रत्येकी तीन कोटी रुपये इतकी असून, ही रक्कम बँकेच्या सांगली येथील मुख्य कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकारी म्हणतात,
प्रकार संशयास्पद
सहा कोटी ही रक्कम मोठी आहे. एवढी रक्कम वाहनातून नेताना बंदूकधारी सुरक्षारक्षक सोबत का घेतला नाही? तसेच निवडणूक कालावधीत बँकेच्या मुख्य कार्यालयात रक्कम जमा करायला जात असताना जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांचे लेखी परवानगीपत्र आवश्यक असते. याबरोबरच सदर रक्कम घेऊन जाताना बँकेतील वरिष्ठ अधिकारीही सोबत असणे गरजेचे असते. मात्र, या प्रकरणात या सर्व त्रुटी आढळल्याने हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद वाटतो, अशी प्रतिक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजीव बुबणे यांनी दिली. दरम्यान, सदर रक्कम उस्मानाबाद येथील कोषागार कार्यालयात जमा करतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागविले असून,बँकेच्या सांगली येथील प्रधान कार्यालयाकडे सदर नोटा पाठवित असल्यामुळे ती रक्कम परत देण्याची विनंती संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सदरील रक्कम संबंधित बँकेच्या ताब्यात द्यावी, किंवा कसे याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.
शंभराच्या नोटा सोबत कशासाठी?
निवडणूक कालावधी, त्यातच हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याचा शासनाचा निर्णय, यामुळे संबंधित अधिकारीही या प्रकरणाची आता कसून चौकशी करू लागले आहेत. माजलगाव शाखेतील तीन कोटी रुपयांच्या विवरणपत्रात ५०० रुपयांच्या ४८ हजार म्हणजेच २ कोटी ४० लाख रुपये व १०० रुपयांच्या साठ हजार म्हणजेच ६० लाख रुपये अशी तीन कोटींची रक्कम असल्याचे म्हटले आहे. तर परभणी शाखेतील पैशांचे विवरण देताना १ हजार रुपयांच्या दहा हजार नोटा म्हणजेच १ कोटी आणि ५०० रुपयांच्या ४० हजार नोटा म्हणजेच ३ कोटी रुपये अशीे एकूण सहा कोटी रुपयांची रक्कम असल्याचे बँकेने म्हटले आहे. हजार-पाचशेबरोबर सध्या मोठ्या प्रमाणावर तूट असलेल्या शंभर रुपयांच्या नोटा मुख्य शाखेत कशासाठी नेल्या जात होत्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबरोबरच बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या राष्ट्रीयकृत मदर बँकेत रक्कम जमा करण्याऐवजी ती मुख्य बँकेत नेण्याचा अट्टाहास कशासाठी, असाही प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.

रक्कम कायदेशीर
सांगली अर्बन बँकेच्या बीड, माजलगाव, वसमत अशा मराठवाड्यातही शाखा आहेत. या शाखांमध्ये जुन्या नोटा साठल्या होत्या. तेथील शाखांनी इतर बँकांत कॅश भरणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या बँकांनी ती कॅश स्वीकारली नाही. त्यामुळे सांगली मुख्यालयातून वाहन, कर्मचारी व आवश्यक ती कागदपत्रे घेऊन ही कॅश सांगलीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कर्मचारी व वाहन पाठविण्यात आले होते. या वाहनावर सुरक्षा रक्षक नव्हता. पोलिस बंदोबस्तासाठीही वेळ लागणार होता. तुळजापूरमध्ये सापडलेली सर्व रक्कम ही सांगली अर्बन बँकेची कायदेशीर रक्कम आहे. आम्ही सर्व ती कागदपत्रे सादर करणार आहोत, असे बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: Sangli Urban's six crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.