वाशीकडे येणाऱ्या रस्त्याची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:45 IST2021-01-08T05:45:38+5:302021-01-08T05:45:38+5:30
(फोटो - मुकूंद चेडे ०५) लोकमत न्यूज नेटवर्क वाशी : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गापासून वाशी शहराकडे येणाऱ्या चार किलोमीटर ...

वाशीकडे येणाऱ्या रस्त्याची झाली चाळण
(फोटो - मुकूंद चेडे ०५)
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशी : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गापासून वाशी शहराकडे येणाऱ्या चार किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
वाशी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरून शहरात यावे लागते. परंतु, राष्ट्रीय महामार्गापासून शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच बसस्थानकाकडे जाणाऱ्या वळणावर व काशी विश्वनाथ मंदिराकडे जाणाऱ्या वळणावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील हे खड्डे चुकवत दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करतच वाहने चालवावी लागत आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेक दुचाकींचे अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झालेले आहेत. शिवाय, वाहने खिळखिळी होऊन वाहन मालकांना आर्थिक भुर्दंडही बसत आहे.
या रस्त्यावरून महाविद्यालय, विद्यालय, ग्रामीण रूग्णालय, गटशिक्षणाधिकारी, दुय्यम निबंधक कार्यालयासह महामार्गाकडे जाणाऱ्या नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडे सतत तक्रारी करूनही संबंधित अधिकारी या रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरूस्त करून नागरिक व वाहनचालकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.