पाझर तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST2021-07-26T04:29:36+5:302021-07-26T04:29:36+5:30

(फोटो : २५ बालाजी बिराजदार) लोहारा : तालुक्यातील बेलवाडी येथील पाझर तलावाचा सांडवा फुटून एक वर्ष पूर्ण झाले तरी ...

Repair of seepage pond drainage stalled | पाझर तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती रखडली

पाझर तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती रखडली

(फोटो : २५ बालाजी बिराजदार)

लोहारा : तालुक्यातील बेलवाडी येथील पाझर तलावाचा सांडवा फुटून एक वर्ष पूर्ण झाले तरी त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे बाजूच्या शेतातील माती वाहून जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोहारा तालुक्यात गेल्यावर्षी १३ व १४ ऑक्टोबरला जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, नाल्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले. अनेक ठिकाणी ओढ्यालगतच्या जमिनीतील पिके, मातीही वाहून जाऊन नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई कुठे मिळाली तर कुठे नाही. त्यात छोट्या-मोठ्या पाझर, साठवण तलावाचेदेखील नुकसान झाले. बेलवाडी येथील पाझर तलावाचा सांडवादेखील या पावसामुळे फुटून बाजूचे शेतकरी प्रदीप रामराव शिंदे यांच्या शेतातील माती वाहून गेली. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे २ डिसेंबर २०२० रोजी तक्रार केली. परंतु, या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे याही पावसात सांडव्यातून पाणी वाहून जात असून, पुन्हा शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.

कोट.....

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पाझर तलावाचा सांडवा फुटून शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. परंतु, वर्ष उलटले तरी अद्याप याच्या दुरुस्तीबाबत कसलीही कार्यवाही झाली नाही. याबाबत शासन दरबारी न्याय मिळत नसेल तर आता न्यायालयीन लढा द्यावा लागेल.

- प्रदीप रामराव शिंदे, शेतकरी, बेलवाडी

Web Title: Repair of seepage pond drainage stalled