तीन हजार पशुधनांची नोंदणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST2021-01-01T04:22:17+5:302021-01-01T04:22:17+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ अंतर्गत येणाऱ्या गावात पशुधनास नोंदणीकृत बिल्ले मारण्याच्या राष्ट्रीय स्तरावरील ...

तीन हजार पशुधनांची नोंदणी पूर्ण
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ अंतर्गत येणाऱ्या गावात पशुधनास नोंदणीकृत बिल्ले मारण्याच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या दवाखान्यास पहिल्या टप्प्यात चार हजार पशुधनाला बिल्ले मारण्याचे लक्ष्य असताना आतापर्यंत तीन हजार पशुधनाला हे बिल्ले मारण्यात आले आहेत.
वाशी तालुक्यातील पारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ अंतर्गत पारगाव, जनकापूर, हातोला, पांगरी, जेबा, रुई, लोणखस, घाटपिंप्री, बनगरवाडी ही गावे येतात. या गावातील पशुधनाला येथील पशुधन विकास अधिकारी सेवा पुरवत आहेत. सध्या राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनावरांची आधार नोंदणी करण्याचे काम सर्वत्र सुरू आहे. यात नोंदणीकृत असलेले बिल्ले पशुधनाच्या कानाला टोचून ते अडकविण्यात येत आहेत. पारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्ग गावातील एकूण पशुधन संख्या जवळपास सात हजार असून, यापैकी पहिल्या टप्प्यात चार हजार पशुधनाला बिल्ले मारण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. आतापर्यंत तीन हजार पशुधनाला हे नोंदणीकृत बिल्ले मारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर चार हजार चारशे पशुधनाला खरकूत लस देण्यात आली आहे.
पारगाव येथे सप्टेंबर २०१९मध्ये ज्ञानेश्वर बाबर यांनी पशुधन विकास अधिकारी पदाचे कामकाज हाती घेतले. तेव्हापासून कामकाजात सुसूत्रता दिसून येत आहे. सध्या या दवाखान्यात दररोज २५ पशुधनाची तपासणी होऊन उपचार केले जात आहेत. शिवाय प्रत्येक वाडी वस्ती, गावात जाऊन हे अधिकारी सेवा देत आहेत.
कोट......
शासनाच्या सुचनेनुसार पशुधनाला नोंदणीकृत बिल्ले मारून पशुधनाची नोंदणी केली जात आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय असून दिलेले लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून काम केले जात आहे. यापुढे पशुधनासंदर्भातील कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी बिल्ला असणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक पशुपालकाने आपापल्या पशुधनास बिल्ले मारून घ्यावेत.
- ज्ञानेश्वर बाबर, पशुधन विकास अधिकारी