तामलवाडी (जि. उस्मानाबाद) -बाजारपेठेत टाेमॅटाेचे दर प्रचंड घसरले आहेत. त्यामुळे उत्पादनखर्च साेडा वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या धाेत्री येथील एका शेतकऱ्याने दाेन एकरावरील टाेमॅटाेची झाडे उपटून बांधावर टाकली. दरम्यान, शिवारातील अन्य भाजीपाला उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत.
तुळजापूर तालुक्यातील धोत्री शिवारातील साठवण तलावामुळे सिंचनाच्या क्षेत्रात माेठी वाढ झाली. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात शेतकरी द्राक्षांसह अन्य फळबागांकडे वळले; परंतु, कालांतराने बदलत्या हवामानामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळले. शिवाजी साठे यांनी माळरानावर सुमारे २ एकर क्षेत्रात ठिबक सिंचनच्या सहाय्याने टाेमॅटाेची लागवड केली. याेग्य नियाेजन आणि पाण्याच्या साेयीमुळे टाेमॅटाेचे पीक जाेमदार आले हाेते. लागवड, फवारणी तसेच दाेरी बांधणीवर तब्बल दीड ते दाेन लाखांचा खर्च झाला. फळधारणा हाेऊन टाेमॅटाेची ताेडणी सुरू झाली तेव्हा बाजारात भावही चांगला हाेता. मात्र, मागील काही दिवसांत टाेमॅटाेचे दर प्रचंड घसरले आहेत. आता तर टाेमॅटाेला प्रतिकिलाे ३ रुपये असा दर मिळत आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून ताेडणी आणि वाहतूक खर्चही निघत नाही. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी शिवाजी साठे यांनी सुमारे दाेन एकरावरील टाेमॅटाेची झाडे उपटून बांधावर टाकली आहेत. या पिकाच्या माध्यमातून आजवर झालेला उत्पादनखर्चही निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, धोत्री शिवारात दोडका, पडवळ, वांगे, काेथिंबीर आदी भाजीपाल्याखालील क्षेत्र माेठे आहे. याही भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकरी चिंतेत आहेत.
चाैकट...
अडीचशे हेक्टरवरील भाजीपाला धोक्यात...
कृष्णा खोरे साठवण तलावाच्या पाण्यावर धोत्री शिवारात दोडका, भोपळा, पडवळ, टोमेटो, कवाळे आदी भाजीपाला अडीचशे हेक्टर क्षेत्रावर उत्पादित केला जाताे. प्रतिदिन ५० टन भाजीपाला पाच टेम्पोद्वारे मुंबई, पुणे आदी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जात आहे. मात्र, योग्य भाव मिळत नसल्याने विक्रीसाठी नेलेला भाजीपाला फुकट वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी अडचणीत आहेत.