पावसाची हुलकावणी, पेरणी १० टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:32+5:302021-06-18T04:23:32+5:30
उस्मानाबाद : निम्मा जून उलटून गेला तरी जिल्ह्यात सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. परिणामी, पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाला ...

पावसाची हुलकावणी, पेरणी १० टक्केच
उस्मानाबाद : निम्मा जून उलटून गेला तरी जिल्ह्यात सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. परिणामी, पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाला विलंब होत चालल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे कल वाढवला असून, जिल्ह्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस हा अनियमित होत असतो. शिवाय, कुठे अतिवृष्टी तर कुठे कोरड अशी स्थिती नेहमीचीच आहे. याचा परिणाम पीक बदलात होत चालला आहे. उशिरा पेरणी झाली व कितीही नैसर्गिक संकटे आली तरी सोयाबीन हे किमान खर्च काढून देणारे पीक म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात दरवर्षी नव्याने भर पडत आहे. दरम्यान, यावर्षीही अशीच स्थिती राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पेरणीसाठी सरासरी १०० मिमी पावसाची गरज आहे. मात्र, आतापर्यंत भूम व तुळजापूर वगळता ही सरासरी कोणत्याही तालुक्याने ओलांडली नाही. यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात लागवडीखाली येणारे क्षेत्र ५ लाख ३२ हजार ७३९ हेक्टर्स इतके आहे. यापैकी आजघडीला केवळ ५४ हजार १९५ हेक्टर्स क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाच्या विलंबामुळे उडीद, मूग या पिकांचा पेरा कमी होत चालला आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २ हजार ९१३ हेक्टर्सवर मूग तर ६ हजार ८९९ हेक्टर्सवर उडीदाचा पेरा झाला आहे. अपेक्षित पेरणीच्या तुलनेत हे क्षेत्र १४ टक्के आहे. कृषी विभागाने यावेळी २ लाख ४० हजार हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होईल, असे गृहित धरले आहे. त्या तुलनेत आजघडीला जिल्ह्यात ३६ हजार ६२९ हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. या शिवाय, प्रमुख पीक असलेल्या तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ८८ हजार ७५१ इतके अपेक्षित आहे. तुलनेत पेरणी ही केवळ ४ हजार ८०१ हेक्टर्सवर झाली आहे. पावसाने आणखी ताटकळत ठेवल्यास उडीद, मुगाच्या आशा मावळतील.
कळंब, तुळजापूर मध्ये सर्वाधिक पेरणी...
जिल्ह्यात पेरणीच्या बाबतीत कळंब व तुळजापूर तालुके आघाडीवर आहेत. कळंब तालुक्यात आतापर्यंत १३ हजार २४० तर तुळजापूर तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. उस्मानाबाद ९२०, भूम ५ हजार ३०२, उमरगा ६९०, वाशी ८३१ तर लोहारा तालुक्यात ३ हजार ३०६ हेक्टर्सवर पेरणी झाली. परंड्यात अद्याप पेरण्या सुरु नाहीत.
पावसाची असमानता कायम...
जिल्ह्यात आतापर्यंत असमान पाऊस झाला आहे. भूम तालुक्यात सर्वाधिक १२४ मिमी तर त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यात ११२ मिमी पावसाची नोंद आहे. उस्मानाबाद ६६, परंडा ५९, कळंब ९८, उमरगा ६५, लोहारा ८२ तर वाशी तालुक्यात ९३ मिमी पावसाची नोंद गुरुवारपर्यंत झाली आहे.