आवक वाढताच दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST2021-09-21T04:36:45+5:302021-09-21T04:36:45+5:30
पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात खरीप हंगामातील सोयाबीनची आवक वाढली आहे. स्थानिक अडत दुकानांवर दररोज शेकडो क्विंटल सोयाबीन ...

आवक वाढताच दरात घसरण
पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात खरीप हंगामातील सोयाबीनची आवक वाढली आहे. स्थानिक अडत दुकानांवर दररोज शेकडो क्विंटल सोयाबीन विक्रीस येत आहे. परंतु, आवक वाढताच दरात दोन ते तीन हजारांची घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. चांगल्या सोयाबीनला पाथरुड येथील व्यापाऱ्यांकडून २० सप्टेंबर रोजी जास्तीत जास्त ६ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. दरम्यान, समाजमाध्यमांवर मात्र सोयाबीनला अकरा हजारांचा दर असल्याचे संदेश फिरत असल्याने शेतकऱ्यांत संभ्रमावस्था दिसून येत आहे.
पाथरुड परिसरात यावर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. सुरुवातीस वेळेवर पाऊस झाल्याने पीक बहरात आले. परंतु, त्यानंतर तब्बल २२ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने पिकाला मोठा फटका बसला. तरीही चांगले उत्पन्न हाती येत आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीस तयार झाले असून, हे नवीन सोयाबीन विक्रीसाठी बाजारात येऊ लागले आहे. यंदा सोयाबीनला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून समाजमाध्यमावर नवीन विक्रीस आलेल्या सोयाबीनला ११ हजार प्रती क्विंटल भाव मिळाल्याची चर्चा आहे. हा भावही खरा आहे. यामुळे शेतकरी आनंदीत आहेत. परंतु, हा भाव नवीन सोयाबीनचे उद्घाटन म्हणून प्रतीकात्मक एका शेतकऱ्याला दिलेला भाव आहे. प्रत्यक्षात नवीन सोयाबीनला चांगल्या मालास जास्तीत जास्त सहा हजार रुपये येथील व्यापाऱ्यांकडून भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
चौकट.........
दोन दिवसांत दोन हजारांनी दर घसरले
१७ सप्टेंबर रोजी विक्री केलेल्या सोयाबीनला ७ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. परंतु, त्यानंतर दोनच दिवसांनी विक्रीस आणलेले सोयाबीन ६ हजार ३०० रुपयांनी विक्री झाले. चर्चा मात्र ८ ते ११ हजार रुपये दराची होती. त्यामुळे नेमके खरे काय अन् खोटे काय, हे कळत नाही.
- बी. एन. वनवे, शेतकरी, आनंदवाडी
सोयाबीन दराबाबत शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता बाजाराचा संपूर्ण अभ्यास करूनच सोयाबीन विक्री करावे. सोयाबीनच्या दराबाबत वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करून विक्रीचा निर्णय घ्यावा. प्रमाणित बियाणे पेरणी केलेले सोयाबीन, सध्या काढलेले व न भिजलेले गुणवत्तापूर्ण असल्यास पुढील हंगामात पेरणीसाठी बियाणे म्हणून राखून ठेवावे.
- निखिल रायकर, मंडळ कृषी अधिकारी