गरोदर मातांनाही मिळणार कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:46+5:302021-07-09T04:21:46+5:30
कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावे, यासाठी नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, गरोदर महिलांना अद्यापर्यंत ही लस घेता येत ...

गरोदर मातांनाही मिळणार कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस
कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावे, यासाठी नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, गरोदर महिलांना अद्यापर्यंत ही लस घेता येत नव्हती. गरोदर मातांना कोरोना झाल्यास इतर महिलांपेक्षा गरोदर मातांमधील आजाराची तीव्रता अधिक असते, त्याचबरोबर गरोदर मातेसाेबतच तिच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही या आजारामुळे विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. यामध्ये कमी कालावधीत प्रसूती होणे, प्रि-एक्लामशिया, सिझेरियनची शक्यता वाढणे, अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता लागणे, मातामृत्यू तसेच नवजात बालकमृत्यू होणे अशा गुंतागुती निर्माण होण्याचा धोका उद्भवू शकतो. ज्या गरोदर मातांना मधुमेह, दमा, सिकलसेल आजार, हृदयविकार, किडनीचे आजार असल्यास त्यांच्यामध्ये वरील धोका होण्याचे प्रमाण कोविड- १९ आजारामुळे अधिक वाढते. यामुळे सर्व गरोदर मातांना कोविड-१९ प्रतिबंधक लस घेऊन त्यांना संरक्षित करण्याकरिता लस देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या उपलब्ध कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी गरोदरपणामध्ये घेण्यास सुरक्षित असल्याने गरोदर मातांचे इतर व्यक्तींप्रमाणे कोविड-१९ आजारापासून संरक्षण होणार असल्याने गरोदर मातांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले. लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम उद्भवल्यास तात्काळ उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले.
लसीबाबत समुपदेशन
९ जुलैरोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानमधून गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या इतर आरोग्य सेवांसोबतच कोविड-१९ प्रतिबंधक लसीबाबत समुपदेशन आणि इच्छुक मातांचे लसीकरण केले जाणार आहे.