आठवडाभरात पॅनल तयार करून मिळविली सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:32 IST2021-01-20T04:32:30+5:302021-01-20T04:32:30+5:30
(फोटो : बालाजी बिराजदार) लोहारा : गावच्या राजकारणापासून तरुण वर्गाला दूर ठेवले जात आहे. गावच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ...

आठवडाभरात पॅनल तयार करून मिळविली सत्ता
(फोटो : बालाजी बिराजदार)
लोहारा : गावच्या राजकारणापासून तरुण वर्गाला दूर ठेवले जात आहे. गावच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून एका आठवड्यात तरुणांनी पॅनल तयार करून ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्याची किमया तालुक्यातील कास्ती बु. येथील तरुण परवेज तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
लोहारा तालुक्यातील कास्ती (बु.) हे अडीच हजार लोकसंख्येचे गाव. ग्रामदैवत कलेश्वरामुळे पंचक्रोशीत परिचित आहे. येथे ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा रंगू लागली. परवेज तांबोळी हे गावातील बाळासाहेब परसे, काका चव्हाण, भागवत चव्हाण, विठ्ठल रवळे, पिंटू राठोड, नारायण कुंभार, सूरज भंडारे, काकासाहेब भंडारे यांच्यासह निवडणुकीची चर्चा करत असताना निवडणुकीत कोणते ही पॅनेल तरुणाना संधी देत नाही. त्यामुळे आपण तरुणांनी एकत्र पॅनेल करून यात गावाच्या विकासाचे व्हिजन घेऊन लोकांसमोर जाऊ, असा प्रस्ताव ठेवला. यावर तरुणांचे एकमत होऊन तयारीही सुरू केली. युवा ग्रामविकास पॅनलच्या बॅनरखाली ही निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. यात पॅनल प्रमुख परवेज तांबोळी यांनी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात न उतरता भावाला उतरविले. मतदारांपुढे आम्हा तरुणांना एखादी संधी द्या, आम्ही करून दाखवतो. गावचा सार्वजनिक विकास, असा विश्वास या तरुणांनी मतदारांना दिला. तसेच यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील दर्जेदार शिक्षण, ग्रामदैवत कलेश्वर मंदिर परिसर विका, गाव अंतर्गत सिमेंट गटारी, रस्ते आदी कामांची हमी दिली. त्यामुळे मतदारांनीही एकदा तरुणांना सत्ता देऊन पाहू, असे म्हणत सर्वच जागांवर युवा ग्रामविकास पॅनलला भरघोस मतांनी विजयी केले.
चौकट....
आश्वासनपूर्तीला प्राधान्य देणार
एकीकडे गावस्तरावर पॅनल करताना जाती-धर्माचा विचार करून उमेदवार दिले जातात. परंतु, त्याला कास्ती (बु.) हे गाव आपवाद ठरले आहे. या गावात मुस्लीम समाजाची घरे बोटावर मोजण्याइतकीच असून, या समाजाची मतदारसंघाच्या पन्नासच्या जवळपास आहे. असे असतानाही परवेज तांबोळी या मुस्लीम युवकाने तरुणांची मोट बांधत युवा ग्रामविकास पॅनल उभे केले. त्यात परवेज यांनी भाऊ आखिल तांबोळी यास प्रभाग तीनमध्ये उभे केले. विशेष म्हणजे त्या प्रभागात एकही मुस्लीम मतदार नाही. परंतु, ग्रामस्थांनी जात, धर्म न पाहता यांच्या पॅनलमधील सर्वच उमेदवारांना विजयी केले आहे. दरम्यान, मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे परवेज तांबोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.