१३०१ केंद्रांतून मिळणार पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:50+5:302021-01-08T05:44:50+5:30
उस्मानाबाद : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत येत्या १७ जानेवारी रोजी जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील १ ...

१३०१ केंद्रांतून मिळणार पोलिओ डोस
उस्मानाबाद : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत येत्या १७ जानेवारी रोजी जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ७७२ बालकांना १ हजार ३०१ केंद्रांच्या माध्यमातून पल्स पोलिओची मात्र दिली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एन. आर. चौगुले, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात ११९०, तर शहरी भागात १११ असे एकूण १३०१ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. मागील मोहिमांचा आढावा घेतला असता स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येतील बालके या लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, वीटभट्ट्या, स्थलांतरित मजूर, प्रवासास निघालेल्या प्रवाशांची बालके यांना त्या-त्या ठिकाणी लसीकरण करण्याची व्यवस्था करून त्यांना पोलिओचा डोस पाजला जाईल, याची दक्षता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घ्यावी. तसेच आशा सेविकांची उपस्थिती पोलिओ लसीकरण केंद्रावर राहील याची दक्षता घ्यावी, असेही दिवेगावकर यांनी सांगितले.
चौकट........
झोकून देऊन काम करा : फड
देशातील पोलिओ संपला आहे, आता कशाला डोस घ्यावयाचा, असे काहींना वाटते; परंतु आपणास देशातील पोलिओ रोगाचे समाजातून समूळ उच्चाटन करून आपले पोलिओमुक्त भारताचे स्थान अबाधित ठेवावयाचे आहे, असे सांगून डॉ. फड यांनी आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी या कामात झोकून देऊन काम करावे, असे आवाहन केले. यावेळी मोहिमेच्या तयारीची माहिती डॉ. वडगावे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.