दहाव्या मिनिटाला मिळणार पोलीस मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST2021-05-25T04:36:28+5:302021-05-25T04:36:28+5:30
उस्मानाबाद : नागरिकांना तत्पर सेवा मिळावी यासाठी पोलीस दल कात टाकत आहे. अत्यंत कमी वेळेत अडचणीतील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक ...

दहाव्या मिनिटाला मिळणार पोलीस मदत
उस्मानाबाद : नागरिकांना तत्पर सेवा मिळावी यासाठी पोलीस दल कात टाकत आहे. अत्यंत कमी वेळेत अडचणीतील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक वाहने पोलीस दलात दाखल होत असून, त्या फोन केल्यापासून किमान दहाव्या मिनिटाला नागरिकापर्यंत पोहोचतील, याअनुषंगाने तयारी सुरु झाली आहे.
घटना घडून गेल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होतात, ही पोलिसांची सिनेमॅटिक छबी बदलण्याचे प्रयत्न गृह विभागाकडून सुरु झाले आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांना फोन करताच तत्परतेने सेवा मिळावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा असलेली वाहने पोलीस दलात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत. सद्य:स्थितीत उस्मानाबाद पोलीस दलात अशी ८ अत्याधुनिक चारचाकी वाहने दाखल झाली आहे. याशिवाय, सध्याच्या नियंत्रण कक्षातच याबाबतच्या संनियंत्रणासाठी आवश्यक असलेले इन्फास्ट्रक्चर तयार केले जात आहे. यासाठी लागणारे संगणकही दाखल झाले आहेत. आणखीही वाहने तसेच दुचाकीही लवकरच मिळण्याची शक्यता असून, लवकरच ही सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत.
पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा...
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत हवी असल्यास येत्या काळात ११२ नंबर डायल करावा लागणार आहे. अडचणीतील नागरिकांशी बोलणे झालेल्या वेळेपासून किमान दहा मिनिटात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, यामाध्यमातून तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न पोलीस दलाचा आहे.
कॉल येताच कळणार लोकेशन...
११२ या हेल्पलाईन नंबरसाठी नागपूर व मुंबई येथे स्वतंत्र दोन सर्व्हर बसविण्यात आले आहेत. अडचणीतील नागरिकाने ११२ नंबर डायल केल्यानंतर त्यांचे कॉल यापैकी एखाद्या सर्व्हरशी जोडला जाईल. येथे फोन करणा-या नागरिकाचे लोकेशनही ट्रेस होईल. यानंतर या लोकेशनच्या जवळ कोणते वाहन उपलब्ध आहे, हे लागलीच तपासून त्या वाहनास नागरिकाचे लोकेशन व नंबर पाठविला जाईल. मग हे वाहन तात्काळ घटनास्थळ गाठेल, अशी ही जवळपास कार्यप्रणाली असणार आहे.
८ चारचाकी वाहने मिळाली...
उस्मानाबाद पोलीस दलाला ११२ हेल्पलाईन नंबरच्या सेवेसाठी स्वतंत्र ८ चारचाकी वाहने आतापर्यंत उपलब्ध झाली आहेत. यामध्ये जीपीएससह इतरही अत्याधुनिक तंज्ञसामग्री आहे. आणखीही काही वाहने तसेच दुचाकीही पोलीस दलास मिळण्याची शक्यता आहे.
कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षण...
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत कशी करावी, यासंदर्भात कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यांचे प्रशिक्षणाचे एक सत्रही पूर्ण झाले आहे.
कोट...
अडचणीतील नागरिकांना तातडीने सेवा मिळावी, यासाठी ११२ हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड या सेवेला असणार आहे. सध्या ही कार्यप्रणाली इनप्रोसेस आहे. यंत्रणा पूर्णत: सक्षम करण्याचे काम सध्या सुरु आहे. लवकरच ती कार्यान्वित करण्याचा पोलीस दलाचा प्रयत्न आहे.
-राज तिलक रौशन, पोलीस अधीक्षक