कळंब परिसरातील भूखंड खरेदी-विक्री रडारवर !; अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 20:44 IST2019-01-22T20:43:54+5:302019-01-22T20:44:45+5:30
शहर व परिसरात मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या भूखंड माफियांची कागदोपत्री बनवेगिरी समोर येण्याची शक्यता.

कळंब परिसरातील भूखंड खरेदी-विक्री रडारवर !; अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
कळंब (जि. उस्मानाबाद): शहर, परिसर व डिकसळ ग्रामपंचायत हद्दीतील भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी करावी व अहवाल सादर करावा, असे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कळंबच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे या भागातील भूखंडाच्या खरेदी-विक्रीमधील बोगसगिरी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संभाजी ब्रिगेडचे राज्य नेते अनंत चोंदे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. कळंब शहर, गावठाण व डिकसळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये काही भूखंडाची खरेदी-विक्री व्यवहार कोणताी अंतिम अकृषी परवाना नसताना, कालबाह्य झालेल्या अकृषी परवान्याच्या आधारे, बनावट अकृषी परवान्याच्या आधारे तसेच नगर रचनाकार यांचा अंतिम रेखांकन आदेश (लेआऊट) नसताना बेकायदेशिरपणे करण्यात आला आहे. या बेकायदेशिर खरेदी-विक्रीच्या नोंदी गाव नमुना नं. ७ मध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांनी संगणमताने केला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. ३० मे २०११ रोजी आदेश जारी करून यासंदर्भात मार्गदर्शन जारी केले होते. तरीही तलाठी, मंडळ अधिकारी, दुय्यम निबंधक, तहसीलदार व नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही या आदेशाची पायमल्ली करून या खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये संशयास्पद भूमिका वठविल्याचे चोंदे यांनी तक्रारीमध्ये म्हटले होते.
याची गंभिरतेने दखल घेऊन अपर जिल्हाधिकारी पराग सोमन यांनी कळंबचे उपविभागीय अधिकारी, नगर रचनाकार उस्मानाबाद, कळंबचे दुय्यम निबंधक तसेच तहसीलदारांना चोंदे यांच्या तक्रारीमधील मुद्यानुसार चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहर व परिसरात मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या भूखंड माफियांची कागदोपत्री बनवेगिरी समोर येण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे चोंदे यांनी स्पष्ट केले आहे.