व्याजाच्या रकमेतून ॲम्ब्युलन्स खरेदीला मागितली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:06+5:302021-03-07T04:29:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : आरोग्य विभागाचा कारभार हा अजूनही भंगारात निघालेल्या ॲम्ब्युलन्सवरच चालत असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर आता जिल्हा ...

व्याजाच्या रकमेतून ॲम्ब्युलन्स खरेदीला मागितली परवानगी
लाेकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आरोग्य विभागाचा कारभार हा अजूनही भंगारात निघालेल्या ॲम्ब्युलन्सवरच चालत असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाच्या रकमेतून रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) खरेदीसाठी परवानगी देण्याची मागणी त्यांनी शनिवारी ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या रुग्णवाहिकांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सध्या असलेल्या ४० रुग्णवाहिकांपैकी तब्बल १४ रुग्णवाहिका या भंगारात काढण्यास पात्र आहेत. त्यांची मुदत संपल्याने त्यांचा इन्शुरन्सही निघत नाही. दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास त्यातील चालकासह इतर कोणालाही कवडीची मदत यामुळे मिळणार नाही. इतकेच नव्हे तर ६ रुग्णवाहिका दुरुस्तीअभावी जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे सध्या अर्ध्या रुग्णवाहिकांच्या माध्यमातूनच काम सुरु आहे. या गंभीर बाबीवर ‘लोकमत’ने ४ मार्च रोजीच्या अंकात सविस्तर प्रकाश टाकला होता. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्षांनी रुग्णवाहिकांच्या स्थितीचा तातडीने आढावा घेतला. त्यांच्याही समोर या गंभीर बाबी आल्यानंतर त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहून नवीन रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी परवानगी देण्याची मागणी शनिवारी केली आहे. त्याला आता कधी मान्यता मिळणार, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे.
साडेपाच कोटींचे भरले व्याज...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना देय असलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्याज जमा होत असते. हे व्याज शासनाला परत भरावे लागते. जिल्हा परिषदेने तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे व्याज नुकतेच शासनाला भरले आहे. या व्याजाच्या रकमेतून रुग्णवाहिकांची खरेदी करुन त्या आरोग्य विभागाला मिळाव्यात, अशी मागणी अस्मिता कांबळे यांनी केली आहे.