पाथरूड येथे पुन्हा ३२ काेंबड्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST2021-01-17T04:27:47+5:302021-01-17T04:27:47+5:30
उस्मानाबाद-पाथरूड : भूम तालुक्यातील पाथरूड येथे मागील चार ते पाच दिवसांपासून काेंबड्या दगावण्याचे सत्र सुरू आहे. शुक्रवार व शनिवार ...

पाथरूड येथे पुन्हा ३२ काेंबड्या दगावल्या
उस्मानाबाद-पाथरूड : भूम तालुक्यातील पाथरूड येथे मागील चार ते पाच दिवसांपासून काेंबड्या दगावण्याचे सत्र सुरू आहे. शुक्रवार व शनिवार अशा दाेन दिवसांत आणखी ३२ काेंबड्या दगावल्याने लाेकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. प्रयाेगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल आला नसल्याने काेंबड्या दगावण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्लूने डाेके वर काढले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही मागील पाच ते सहा दिवसांपासून काेंबड्या तसेच कावळे दगावण्याचे सत्र सुरू झाले आहे. सुरुवातीला म्हणजेच १२ जानेवारी राेजी लाेहारा तालुक्यातील खेड शिवारात चार कावळे दगावले हाेते. यानंतर सलग दुस-या दिवशी आणखी आठ कावळे दगावले. तसेच बलसूरमध्येही एक कावळा मृतावस्थेत आढळून आला हाेता. हे सत्र थांबते ना थांबते ताेच १४ जानेवारीपर्यंत पाथरूड येथील शेतकरी मच्छिंद्र रामहरी तिकटे यांच्या शेतातील पाेल्ट्री फार्ममधील १९ काेंबड्या दगावल्या. पशुसंवर्धन विभागाच्या डाॅक्टरांनी तेथे जाऊन उपाययाेजना केल्या. परंतु, काेंबड्या दगावण्याचे सत्र थांबलेले नसून शुक्रवार व शनिवार अशा दाेन दिवसांत आणखी ३२ काेंबड्या दगावल्या आहेत. त्यामुळे आजवर तिकटे यांच्या फार्ममधील दगावलेल्या काेंबड्यांची संख्या ५१ एवढी झाली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांत धास्ती निर्माण झाली आहे.
चाैकट...
अहवाल येणार तरी कधी?
खेड येथील दगावलेल्या कावळ्यांचे नमुने साधारपणे पाच ते सहा दिवसांपूर्वी पुणे येथील प्रयाेगशाळेत पाठवण्यात आले आहेत. काेंबड्यांचे नमुने पाठवूनही चार ते पाच दिवसांचा कालावधी लाेटला आहे. मात्र, अद्याप अहवाल आलेला नाही. त्यामुळे हा अहवाल येणार तरी कधी, असा सवाल आता ग्रामस्थांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
काेट...
पाथरूड येथील तिकटे यांची ज्या गावरान कोंबड्यांची पिले मृत्युमुखी पडली हाेती, त्यांची आम्ही पाहणी केली आहे. प्रथमदर्शनी संबंधित काेंबड्या ‘बर्ड फ्लू’मुळे दगावल्या नसल्याचे दिसते. असे असले तरी पाच काेंबड्यांचे नमुने भाेपाळ येथील प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या अहवालानंतरच काेंबड्या दगावण्यामागचे कारण स्पष्ट हाेईल.
-डाॅ. सत्यजित जाधव, पशुधन विकास अधिकारी, पाथरूड