लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : तालुक्यातील उदतपूर येथील ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका दिवसात लोकवर्गणी जमा करून यातून ऑक्सिजन निर्मिती मशीन खरेदी केली असून, येथील ग्रामीण रूग्णालयाकडे ती सोमवारी सुपूर्द करण्यात आली.
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील ग्रामीण रूग्णालयावर अतिरिक्त ताण वाढला आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासारख्या सुविधांचा कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रूग्णालयात आलेल्या रूग्णांना इतर ठिकाणी रेफर करावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेत, तालुक्यातील उदतपूर येथील ग्रामस्थ रूग्णालयाच्या मदतीला धावून आले. येथील ग्रामस्थांनी वर्गणीतून ग्रामीण रूग्णालयाला ऑक्सिजन निर्मिती मशीन देण्याचा निर्णय घेतला. गावातील प्रमुख मंडळींनी ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत प्रत्येकाने आपापल्यापरिने मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे एका दिवसात ७० हजार रूपये जमा झाले. या जमा रकमेतून ऑक्सिजन मशीन खरेदी केली. सोमवारी तहसीलदार संतोष रूईकर, स्पर्श रूग्णालयाचे प्रकल्प समन्वयक रमाकांत जोशी यांच्या उपस्थितीत ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. जी. के. साठे यांच्याकडे ही ऑक्सिजन मशीन सुपूर्द करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, डॉ. इरफान शेख, प्रवीण कांबळे, खंडू शिंदे, राजू कांबळे, उदतपूरचे माजी सरपंच माधवराव पाटील, गोवर्धन मुंसाडे, बालाजी पवार, प्रा. महादेव सोनटक्के, तुळशीराम पवार, गुंडेराव पवार, किसन बनसोडे, तुकाराम पवार, आदी उपस्थित होते.
फोटो - उदतपूर ग्रामस्थांनी लोकसहभागातून लोहारा ग्रामीण रूग्णालयाला ऑक्सिजन निर्मिती मशीन भेट दिली. यावेळी तहसीलदार संतोष रूईकर, स्पर्श रूग्णालयाचे प्रकल्प समन्वयक रमाकांत जोशी, डॉ. जी. के. साठे, डॉ. अशोक कटारे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, उदतपूरचे माजी सरपंच माधवराव पाटील, गोवर्धन मुंसाडे, बालाजी पवार, प्रा. महादेव सोनटक्के आदी उपस्थित होते.