पाच हजारांवर नागरिकांची झाली आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST2021-04-26T04:29:28+5:302021-04-26T04:29:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भूम : प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत शहरातील आठ प्रभागांमध्ये ...

Over five thousand citizens underwent health check-ups | पाच हजारांवर नागरिकांची झाली आरोग्य तपासणी

पाच हजारांवर नागरिकांची झाली आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

भूम : प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत शहरातील आठ प्रभागांमध्ये तपासणी सुरु असून, आतापर्यंत १ हजार १०४ कुटुंबातील ५ हजार २८० नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे.

दिनांक २१ ते ३० एप्रिल या कालावधीत हे अभियान सुरु राहणार आहे. शहरातील ८ प्रभागांमध्ये ४८ शिक्षकांमार्फत हे काम सुरू असून, यासाठी १६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाचे तापमान, ऑक्सिजन तपासणी, कोरोनाची लक्षणे व दुर्धर आजारांची चौकशीही केली जात आहे. गतवर्षी या मोहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक कुटुंबाची तपासणी करण्यात आली होती. यावर्षी मार्चपासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याने ही मोहीम पुन्हा हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जवळपास शहरातील ४ हजार २५ कुटुंबातील २२ हजार ७७ नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या मोहिमेंतर्गत आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालिका गटनेते संजय गाढवे यांनी केले आहे.

दुर्धर आजाराचे १६५ रुग्ण

या मोहिमेंतर्गत आतापर्यंत शहरातील आठ प्रभागांमधील ५ हजार २८० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात दुर्धर आजार असलेले १६५ रुग्ण आढळले. ही मोहीम ३० एप्रिलपर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती मोहीम समन्वयक व्ही. व्ही. बिराजदार यांनी सांगितले.

फोटो : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत भूम शहरातील समर्थ नगर भागात नागरिकांची आरोग्य तपासणी शिक्षक मुळीक, कुटे, मुपडे आदींनी केली.

Web Title: Over five thousand citizens underwent health check-ups