उमरग्यात डेंग्यूसदृश आजाराचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:36 IST2021-08-28T04:36:30+5:302021-08-28T04:36:30+5:30
उमरगा : शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात मागील दोन महिन्यांपासून डेंग्यूसदृश व चिकुनगुनियासदृश आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे शहरासह ...

उमरग्यात डेंग्यूसदृश आजाराचा उद्रेक
उमरगा : शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात मागील दोन महिन्यांपासून डेंग्यूसदृश व चिकुनगुनियासदृश आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आराेग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
उमरगा तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत उमरगा शहरासह तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावामध्ये डेंग्यूचे २१ रुग्ण तर चिकुनगुनिया आजाराचे ४ रुग्ण आढळून आले. चिकुनगुनियासदृश रुग्णाची संख्या शेकडोंच्या संख्येत आहे. मुख्यतः बालकांमध्ये हा आजार बळावत असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाकडून जुलै महिन्यात केवळ एकदा डेंग्यू या आजाराचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात फवारणी केली. त्यानंतर कोणत्याही उपाययोजना वा साफसफाईकडे लक्ष दिले नाही. सध्याच्या घडीला उमरगा शहरात सर्वच भागांत घाणीचे साम्राज्य आहे. स्वच्छतेकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे उमरगा शहरवासीयात मोठी नाराजी आहे. ग्रामीण भागात आरोग्य विभागामार्फत सर्व प्रभावित गावांत उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात ‘आबेट’ची फवारणी करण्यात आली. संबंधित गावातील प्रत्येक घरातील पाणीसाठ्याचे कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करून पाण्यात डासांच्या अळ्या आहेत का? असल्यास त्याचे निर्मूलन करण्यात येत आहे. यासाेबतच अन्य उपाययाेजनाही करण्यात येत आहेत.
चाैकट...
ही आहेत लक्षणे...
डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासामुळे होतो. ताप येणे, अशक्तपणा जाणविणे, चिडचिड वाढणे आदी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे जाणवल्यास हलगर्जीपणा न करता नजीकच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच घर व परिसरात स्वच्छता राखणे, गटारीची सफाई, घरातील पाण्याची टाकी कोरडी ठेवणे आदी स्वरूपाची काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे.
पालिकेला पत्र देऊनही पालिका उदासीन
आरोग्य विभागाच्या वतीने उमरगा पालिकेला पत्र देऊन डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आलेल्या परिसरात साफसफाई, डास निर्मूलन, औषध फवारणी व पाण्याचे साठे तपासणी करण्यात यावी. तसेच लाेकांमध्ये जनजागृती करण्याबाबत सूचित केले आहे. परंतु, अद्याप उपाययाेजना हाती घेण्यात आलेल्या नाहीत.
काेट...
उमरगा तालुक्यात गेल्या दोन ते अडीच महिन्यांत डेंग्यूसदृश रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले. आम्ही प्रभावित गावात उपाययोजना सुरू केल्या असून जनजागृती, साफसफाई, औषध फवारणी अभियान सुरू केले. आरोग्य सेविकांमार्फत घरोघरी जाऊन ताप तपासणी केली जात आहे. गावस्तरावर नागरिकांना योग्य ती काळजी घेण्यासंबंधी मार्गदर्शन केले जात आहे.
- डॉ. प्रताप शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, उमरगा
डेंग्यू व चिकुनगुनियासदृश आजारासोबतच संसर्गजन्य आजाराची लक्षणे बालकवर्गात जास्त दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांत आमच्याकडे तीसच्या आसपास डेंग्यूसदृश लक्षणांची बालके उपचारांती बरी होऊन घरी गेली आहेत. त्याचबरोबर संसर्गजन्य सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेवर उपचार केल्यास बालके लवकर बरी होतात.
- डॉ. एन.डी. बिराजदार, बालरोगतज्ज्ञ