आश्रम शाळेवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:25+5:302021-07-07T04:40:25+5:30
नळदुर्ग : येथील नाईक मागास समाजसेवा मंडळ संचलित आश्रम शाळेवर प्रशासकाची नियुक्ती करावी किंवा आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई ...

आश्रम शाळेवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश
नळदुर्ग : येथील नाईक मागास समाजसेवा मंडळ संचलित आश्रम शाळेवर प्रशासकाची नियुक्ती करावी किंवा आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई तातडीने करण्याचे आदेश लातूर येथील समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांनी उस्मानाबाद जिल्हा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत.
येथील माध्यमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत असलेले सुरेश नकाते हे ३० नोव्हेंबर २०२० रोजी नियतवयोमानाने सेवानिवृत्त झाले होते. यानंतर नकाते यांना कोरोना विषाणूची लागण होऊन २० जून २०२१ रोजी त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या पत्नी सुलभा नकाते यांनी २२ जून रोजी नाईक मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रादेशिक उपायुक्त आदींना पत्रव्यवहार करून हकीकत कळवली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्याध्यापक सुरेश नकाते हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले असतानाही संबंधितांनी त्यांना सेवावृत्ती, कुटुंब निवृत वेतन योजना व अन्य लाभ दिलेला नाही. उलट त्यांना त्रास होईल असे वर्तन त्यांच्या सोबत झाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले. त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर व डोक्यावर झाला. त्यातच त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. पैसे नसल्याने आम्ही त्यांना चांगले उपचार करू शकलो नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर कारवाई करण्याकरिता प्रादेशिक उपायुक्तांनी उस्मानाबाद समाजकल्याण विभाग सहाय्यक आयुक्तांना ३० जून रोजी केलेल्या पत्रव्यवहारात ‘ती संस्था कर्मचाऱ्याचा छळ करीत आहे, शासन नियमाप्रमाणे कामकाज करीत नाही. वरिष्ठांच्या आदेशाचा अंमल करीत नाही. त्यामुळे त्या आश्रम शाळेवर प्रशासक नेमावे किंवा आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा’, असे आदेशित केले आहे. या आदेशामुळे मनमानी करून कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या संस्थांचे धाबे दणाणले आहेत.
050721\img-20210705-wa0009.jpg
प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण यांचे आदेश.