जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘प्रहार’ची निदर्शने
By Admin | Updated: November 6, 2015 00:41 IST2015-11-06T00:40:56+5:302015-11-06T00:41:09+5:30
उस्मानाबाद येथे जेलभरोचा इशारा : बच्च कडू व अपंगांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘प्रहार’ची निदर्शने
कोल्हापूर : उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेवर नुकताच आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे यांनी दडपशाही करीत आंदोलकांवर अत्याचार केले. याचे पडसाद गुरुवारी कोल्हापुरात उमटले. प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
दुपारी एकच्या सुमारास अपंग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत या घटनेचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांना निवेदन दिले.
उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेवर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील अपंग बांधवांनी मोर्चा काढला होता. यावेळी हे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस उपअधीक्षक हिरे यांनी आमदार कडू व अपंग बांधवांवर गुन्हे दाखल करीत त्यांना अन्यायी वागणूक दिली. पदाचा गैरवापर केल्याबद्दल हिरे यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर आमदार कडू व अपंगांवरील गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा, मंगळवारी (दि. १०) उस्मानाबाद येथे राज्यभरातील अपंग बांधव जेलभरो आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, रवींद्र पायमल, बाळासो गायकवाड, संजय पोवार, तुकाराम पाटील, विकास चौगुले, युनूस शेख, प्रशांत म्हेत्तर, रूपाली पाटील, कल्पना वावरे, उज्ज्वला चव्हाण, शैलेश सातपुते, नारायण मडके, उमेश चटके, बळवंत पाटील, आदी सहभागी झाले होते.