उघड दार देवी आता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:27+5:302021-06-20T04:22:27+5:30
अजित चंदनशिवे तुळजापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढल्याने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी ...

उघड दार देवी आता...
अजित चंदनशिवे
तुळजापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढल्याने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर एप्रिल महिन्यात भाविकांसाठी बंद करण्यात आले. यामुळे मंदिरावर अवलंबून असलेले साडेसातशे व्यापारी, अडीच हजारांच्या आसपास पुजाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले आहे.
पहिल्या टप्प्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. ते तब्बल आठ ते नऊ महिने मंदिर बंद राहिले. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रशासनाने नियम, अटी लादून भाविकांसाठी मंदिर खुले केले. त्यामुळे पुजारी, व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा मंदिर बंद करावे लागले. यामुळे जवळपास अडीच हजार पुजारी वर्ग, ७५० ते ८०० छोटे-मोठे व्यापारी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.
दर्शन घेण्याची इच्छा आहे. मात्र, मंदिर उघडले तर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. व्यावसायिकांना देखील संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे मंदिर बंद राहिलेलेच योग्य राहील. आमच्याकडे सर्व व्यावसायिकांना अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केली आहे. त्याच अनुषंगाने मंदिर प्रशासनाने व्यापारी, पुजारी व व्यावसायिकांना अन्नधान्य किटसह आर्थिक मदत करावी.
- स्वप्नील घाटे, भाविक, पुणे
मागील अनेक वर्षांपासून आम्ही श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी परिवारासह येतो;मात्र कोरोना संक्रमणामुळे मंदिर बंद आहे. त्यामुळे आम्हाला महाद्वाराचे दर्शन घेऊन परतावे लागत आहे. मंदिरावर अवलंबून असलेल्या पुजारी, व्यावसायिकांचा विचार करून मंदिर सुरू करणे गरजेचे आहे.
- परमेश्वर खटके, भाविक, जालना
मंदिर बंद असल्याने भाविक निराश होऊन महाद्वाराचे दर्शन घेऊन जात आहेत. भाविकांना कळसाचे सुद्धा दर्शन होत नाही. हजारो भाविक फोन करून मंदिराबाबत विचारणा करीत आहेत. दोन वर्षांच्या कालावधीमध्ये ११ महिने मंदिर बंद आहे. मंदिर संस्थानने कुठलीही मदत केली नाही. पहिल्या लाटेनंतर तीन महिने मंदिर उघडण्यात आले होते. तेव्हा एकही पुजारी आजारी पडला नव्हता. त्यामुळे आता कोरोनाचे नियम लावून मंदिर उघडावे.
- विजय भोसले, पुजारी
देवीच्या मूर्ती आणि पूजेच्या साहित्याचे दुकान चालवून आम्ही कुटुंबाची उपजीविका भागवितो; मात्र कोरोनामुळे पहिल्या टप्प्यात ८ महिने मंदिर बंद राहिले. त्यानंतर काही दिवस मंदिर खुले करण्यात आले;मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा मंदिराची दारे बंद झाल्याने आता उपजीविका भागविणे कठीण झाले आहे.
- संजय बोंदर, व्यावसायिक
मंदिरावरच आमचा व्यवसाय अवलंबून आहे. यावरच आमच्या कुटुंबासह सहा कामगारांची उपजीविका भागविली जाते. मात्र, दोन वर्षांत ११ महिने मंदिर बंद राहिल्याने व्यवसायाला सुद्धा कुलूप लावण्याची वेळ आली आहे. आता सगळीकडे अनलॉक झाले आहे. त्यामुळे मंदिरेही उघडण्यास हरकत नाही.
मंगेश डेरके, व्यावसायिक