खरीप हंगामात घरातील बियाणेच वापरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:33 IST2021-04-24T04:33:29+5:302021-04-24T04:33:29+5:30
लोहारा : येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी असलेले व पावसात न भिजलेले सोयाबीनचे बियाणे उगवणशक्ती तपासूनच पेरणीसाठी वापरावे, ...

खरीप हंगामात घरातील बियाणेच वापरावे
लोहारा : येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी असलेले व पावसात न भिजलेले सोयाबीनचे बियाणे उगवणशक्ती तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे.
लोहारा तहसील कार्यालयात खा. राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार आर. आर. शिराळकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, गटविकास अधिकारी ए. के. अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, मुख्याधिकारी गजानन शिंदे आदी उपस्थित होते.
खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, सद्य:स्थितीमध्ये सोयाबीनचे भाव वाढलेले असले तरी त्या प्रमाणात पुढे बियाणांचे भाव हे वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व बियाणे विक्री न करता घरी पेरणीसाठी मुबलक प्रमाणात शिल्लक ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वाढत असलेला कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासह लोहारा शहर व ग्रामीण रुग्णालय लोहारा येथील ऑक्सिजन बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव करून कोरोना रुग्णांची अडचण दूर करण्याची मागणी केली, तर गरज भासल्यास कोविड केअर सेंटरचे नियोजन करण्यासाठी युवासेना शिवसेनेतर्फे स्वयंसेवक देण्याचे सांगितले, तर आ. ज्ञानराज चौगुले म्हणाले की, बियाणामध्ये बचत करणे व उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी रुंद सरी, वरंबा (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी आजपर्यंत तालुक्यातील १८ गावांमध्ये बियाणे उगवणशक्तीची प्रात्यक्षिके कोरोना नियमांचे पालन करून करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन पणुरे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, दीपक जवळगे, शेखर पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अभिमान खराडे, नगरसेवक शाम नारायणकर, शहरप्रमुख सलिम शेख आदींची उपस्थिती हाेती.