ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांत वाढले डोळ्यांचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:10+5:302021-01-08T05:44:10+5:30

उस्मानाबाद : कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. यामुळे प्रत्येक मुलांकडे आता मोबाईल आहे, पण मोबाईलच्या अतिवापरामुळे ...

Online has increased eye diseases among students | ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांत वाढले डोळ्यांचे आजार

ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांत वाढले डोळ्यांचे आजार

उस्मानाबाद : कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. यामुळे प्रत्येक मुलांकडे आता मोबाईल आहे, पण मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना डोळ्यांच्या अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन अभ्यास करताना डोळ्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे.

लाॅकडाऊनमुळे शाळा, काॅलेज बंद झाले. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. मात्र, अभ्यासक्रमासाठी मोबाईलचा अतिवापर अंगलट येत असल्याचे समोर येत आहे. सात महिन्यांपासून ऑनलाईन तासिका, शैक्षणिक ॲपचा वापर प्रतिदिन वाढू लागला आहे. शिवाय, यातून काही वेळ मिळताच विद्यार्थी गेम खेळण्यात व्यस्त होत आहेत. मोबाईल स्क्रिनिंग टाईम वाढत असल्याने त्याचा ताण डोळ्यावर पडत आहे. परिणामी, ५ ते १६ वयोगटातील मुलांमध्ये डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यांतून पाणी गळणे, डोळे लाल होणे असे त्रास जाणवू लागले असल्याचे बालरोगतज्ज्ञानी सांगितले.

अतिताण पडत असल्याने मुलांना अंधूक दिसू लागल्याच्या तक्रारी वाढल्याने चष्मा लागत आहे. ज्या मुलांना अगोदरच चष्मा लागलेला आहे. त्या चष्म्याचेही नंबरही वाढत आहेत.

ऑनलाईन शिक्षणप्रणाली लाॅकडाऊन काळात उपयुक्त ठरली असली तरी अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यावर ताण येत आहे. त्यामुळे ५ वयोगटापर्यंतच्या मुलांना दिवसातील १ तासच स्क्रिनिंग टाईम देणे गरजेचे असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.

मोबाईलवरचे शिक्षण संपल्यावर मुलांकडून लगेच मोबाईल काढून घेतला पाहिजे. त्यांना मोबाईलचे व्यसन लागू नये याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे. आपला पाल्य ऑनलाईन शिक्षण घेत असताना तो अभ्यासच करत आहे का नाही, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.

ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम

ज्या विद्यार्थ्याकडे मोबाईल आहे, अशाच विद्यार्थ्यांना ऑनलाइईन शिक्षणाचा लाभ घेता येतो, पण त्यांना डोळ्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक मुलांचे डोळे लाल होणे, उन्हाकडे पाहू न शकणे, चष्म्याचा नंबर वाढणे, अंधारी येणे अशा प्रकारचे त्रास हाेत आहेत.

अतिवापर धोक्याचा

जास्त स्क्रिन टाईम झाल्याने डोळे लाल होणे, डोळे जळजळ होणे, चष्म्याचा नंबर वाढणे असे प्रकार होत आहेत. ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना १ ते २ तास स्क्रिन टाईम देणे गरजेचे आहे. ऑनलाईन क्लासबरोबरच सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडत आहे.

डॉ. आर. यु. बोराडे, , बालरोगतज्ज्ञ

मोबाईलचा वापर कमी केला

मुले दिवसभर मोबाईलवरच असतात. मोबाईल हाताळल्याने त्यांना रात्री लवकर झोपही येत नाही. पुस्तके वाचताना कंटाळा करीत आहेत. ऑनलाईन अभ्यासापेक्षा शाळेतील अभ्यासच चांगला आहे. मोबाईलपासून दूर ठेवण्याकरिता मुलांना इतर कामांत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गणेश वाघमारे, पालक

Web Title: Online has increased eye diseases among students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.