ऑनलाइन गंडा घालणारा बिहारी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST2021-07-21T04:22:39+5:302021-07-21T04:22:39+5:30
उस्मानाबाद तालुक्यातील सकनेवाडी येथील शरद नामदेव सिरसाठ यांना २९ डिसेंबर, २०२० रोजी एका अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. त्या ...

ऑनलाइन गंडा घालणारा बिहारी गजाआड
उस्मानाबाद तालुक्यातील सकनेवाडी येथील शरद नामदेव सिरसाठ यांना २९ डिसेंबर, २०२० रोजी एका अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. त्या कॉलवरील अनोळखी व्यक्तीने सिरसाठ यांना आपण रिलायन्स फायनान्स कंपनीचा मॅनेजर बोलत असल्याचे भासविले. कंपनीकडून तुम्हाला १ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. ते मिळविण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. या प्रक्रियेसाठी लागणारे ३० हजार २९९ रुपये आरोपीने खात्यावर टाकण्यास सांगितले. सिरसाठ यांना हा प्रकार खराच वाटल्याने, त्यांनी फारशी खात्री न करता सांगितलेली रक्कम आरोपीने सांगितलेल्या खात्यावर पाठवून दिली. यानंतर, आरोपीचा संपर्कच बंद झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला. हे प्रकरण सायबर ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले. सायबर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन तांत्रिक विश्लेषणे केली. या कामी कर्मचारी कुलकर्णी, संजय हालसे, राहुल नाईकवाडी, गणेश जाधव, आकाश तिळगुळे, मकसूद काझी, अनिल भोसले, सुनील मोरे, गणेश हजारे, विमल पौळ, नलावडे, अपेक्षा खांडेकर यांनीही मदत केली. अखेर त्या खात्यावरून आरोपीचा माग लागला. आरोपी हा बिहार राज्यातील रहिवासी असून, त्याचे नाव राहुल कुमार लखन प्रसाद लहेरी (२१) असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर, उपनिरीक्षक अनिल टोंगळे, कर्मचारी किशोर रोकडे, गणेश खैरे, बळीराम घुगे यांच्या पथकाने बिहार राज्यातील भागलपूर भागात ७ दिवस आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. अधिक तपासासाठी त्यास मंगळवारी उस्मानाबादेत आणण्यात आले आहे. त्याने आणखीही असे काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे.