नव्यासाठी निधी नसताना पाडले जुने स्वच्छतागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:52+5:302021-01-08T05:43:52+5:30
उमरगा : शहरातील भीमनगर भागात नवीन स्वच्छतागृह बांधण्यासाठी पालिका प्रशासनाच्या आदेशानुसार गुत्तेदाराने जुने बांधकाम पाडले खरे. परंतु, आता ज्या ...

नव्यासाठी निधी नसताना पाडले जुने स्वच्छतागृह
उमरगा : शहरातील भीमनगर भागात नवीन स्वच्छतागृह बांधण्यासाठी पालिका प्रशासनाच्या आदेशानुसार गुत्तेदाराने जुने बांधकाम पाडले खरे. परंतु, आता ज्या निधीतून हे काम होणार होते, तो निधीच शिल्लक नसल्यामुळे गुत्तेदाराने बांधकाम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेच्या या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उमरगा शहरातील प्रभाग २ मधील भीमनगर येथे २० वर्षांपूर्वी बांधलेले सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. अत्यंत दाट वस्ती असलेल्या या भागात वैयक्तिक स्वच्छतागृह करण्यासाठी नागरिकांकडे जागा नसल्याने या भागात हे १२ स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. परंतु, याची साफसफाई वेळेवर होत नसल्याने ते तुंबण्याचे प्रकार वाढले होते. दरम्यान, पालिकेतील सत्ताधारी मंडळींनी ही स्वच्छतागृहे जुनी झाल्याने या ठिकाणी नवीन स्वच्छतागृहे बांधण्याचा ठराव घेऊन याची प्रशासकीय मान्यता व वर्क ऑर्डरची प्रक्रियादेखील तात्काळ पार पाडली. परंतु, काम सुरू करण्याअगोदर यातील मैला साफ करणे गरजेचे होते व त्यासाठीची मशीन उपलब्ध न झाल्याने हे काम रेंगाळले. तब्बल दोन वर्षे या कामाकडे दुर्लक्ष झाले.
दरम्यान, मागील महिन्यात या कामासाठी स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर पालिका प्रशासनाने हे काम चालू करण्याच्या सूचना संबंधित गुत्तेदारास दिल्या. त्यानुसार गुत्तेदाराने जुने बांधकामही पाडले. परंतु, नंतर ज्या योजनेतून हे काम करायचे होते, त्याचा निधीच शिल्लक नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे गुत्तेदाराने आता हे काम करण्यास नकार दिला आहे. परिणामी दोन वर्षांनंतर सुरू झालेले काम निधीअभावी पुन्हा थांबले असून, स्वच्छतागृहाअभावी या भागातील दोनशेवर नागरिकांची गैरसोयदेखील होत आहे.
चौकट........
दोन वर्षानंतर आदेश ?
चौदावा वित्त आयोगाचा कालावधी संपून आता पंधराव्या वित्त आयोगाचा निधी पालिकेला उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे, पालिका प्रशासनाने वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम तीन महिन्यांत सुरू करणे गरजेचे असताना दोन वर्षांनंतर काम करण्याचे आदेश दिलेच कसे? शिवाय, एखाद्या कामाला उशीर झाल्यानंतर त्यास मुदतवाढ घेणे गरजेचे आहे. परंतु, येथे तशी कार्यवाही झाली का, असा प्रश्नही आता शहरवासियांतून विचारला जात आहे.
१४ व्या वित्त आयोगातून होती निधीची तरतूद
भीमनगर भागातील या शौचालयाचे काम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केले जाणार होते. यात १२ शौचालये व लघुशंकागृहाच्या २० लाख १३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ७ फेब्रुवारी २०१९ रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. यानंतर ७ मार्च रोजी याची वर्क ऑर्डर देण्यात आली. परंतु, गुत्तेदाराच्या दुर्लक्षामुळे हे काम झालेच नाही.
कोट.......
संबंधित गुत्तेदारास जुने बांधकाम लगेच पाडू नका, असे सांगितले होते. परंतु, त्यांनी ते पाडले आहे. आता निधी नसल्याने त्यांनी काम बंद ठेवले आहे. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे येथील रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत असून, पालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- सतीश सुरवसे, माजी नगरसेवक, भीमनगर
कोट.....
मंजूर कामाच्या योजनेतील निधी इतर कामासाठी खर्च झाला असून, या कामासाठी दुसऱ्या योजनेतून निधीची तरतूद केली जाईल. सध्या येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेडिमेड शौचालय मागविण्यात येणार आहेत. त्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. लवकरात लवकर हे शौचालये उभारण्यात येतील.
- रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी