मराठा आरक्षणाचे अपयश लपविण्यासाठी ओबीसीचे आरक्षण घालविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:05+5:302021-06-23T04:22:05+5:30
उस्मानाबाद : गेल्या दीड वर्षात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरले असून, कोणताच समाज या सरकारच्या काळात ...

मराठा आरक्षणाचे अपयश लपविण्यासाठी ओबीसीचे आरक्षण घालविले
उस्मानाबाद : गेल्या दीड वर्षात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरले असून, कोणताच समाज या सरकारच्या काळात समाधानी नाही. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण रद्द झाले. ठाकरे सरकारला आलेले हे अपयश लपविण्यासाठी त्यांनी ओबीसीचे आरक्षण घालविले, असा घणाघाती आरोप करून ओबीसीचे आरक्षण सन्मानाने परत मिळावे यासाठी येत्या २६ जून रोजी भाजपच्या वतीने राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली.
जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींसह ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्याक्ष योगेश टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शाहू महाराजांनी मागे पडलेल्या समाजाला पुढे आणण्यासाठी आरक्षण देऊन सन्मान केला. मात्र, राज्यात ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात राज्य शासनाने दुर्लक्षित करून वेळकाढू भूमिका घेतल्याने रद्द झाले. एस.सी. आणि एस.टी. समाजातील पदोन्नतीचे आरक्षण ठाकरे सरकारने रद्द केले असल्याचे सांगून योगेश टिळेकर म्हाणाले, गेल्या चाळीस वर्षांपासून आरक्षणासाठी मराठा समाज झगडत होता. मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी सत्तेचा उपभोग घेतला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आणि उच्च न्यायालयात टिकविले. राज्यात सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने मात्र सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने बाजू मांडली नसल्याने हे आरक्षण रद्द झाले. मराठा आरक्षणाचे अपयश लपविण्यासाठीच ओबीसीचे आरक्षण या सरकारने घालविले, असा आरोप त्यांनी केला.
आरक्षण प्रश्नासंदर्भात संघर्ष नाही केला तर येणारी पिढी माफ करणार नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यासह कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत येणाऱ्या काळात ओबीसीचा उमेदवार दिसणार नाही. राज्यातील ३५० जातींतून एकही व्यक्ती निवडणुकीसाठी उभी राहता कामा नये, हाच हेतू राज्य सरकारचा दिसून येतो. मात्र, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत हीच भाजपची भूमिका असल्याचे टिळेकर यांनी स्पष्ट केले.
ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रदेश कार्यकारिणी सदस्य खंडेराव चौरे यांनीही विचार मांडले. बैठकीस नेताजी पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी, सुधीर पाटील, पिराजी मंजुळे, पांडुरंग लाटे, लक्ष्मण माने, प्रदीप शिंदे, साहेबराव घुगे, आदेश कोळी, नितीन भोसले, व्यंकटराव गुंड, राजसिंह राजेनिंबाळकर यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट.......
दोन ठिकाणी होणार आंदोलन
या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडता आली नाही. साहजिकच यामुळे हे प्रकरण अजून क्लिष्ट झाले आहे. मराठा आणि ओबीसी हे दोन्ही घटक महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या हक्कांवर गदा आणल्यास सहन केले जाणार नाही. येणाऱ्या २६ तारखेला जिल्ह्यात येडशी व तामलवाडी येथील टोल नाक्यांवर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून जनतेने या आंदोलनात सहभागी होत राज्य सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.