वाशीतील रुग्णसंख्या सव्वाशेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:30 IST2021-05-22T04:30:23+5:302021-05-22T04:30:23+5:30
वाशी : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत असून, शुक्रवारी विविध ठिकाणच्या चाचण्यांमधून तब्बल ७८ नवीन कोरोना रुग्ण आढळून ...

वाशीतील रुग्णसंख्या सव्वाशेवर
वाशी : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत असून, शुक्रवारी विविध ठिकाणच्या चाचण्यांमधून तब्बल ७८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. सद्य:स्थितीत तालुक्यात ७२१, तर शहरात १२६ रुग्ण ॲक्टिव्ह असून, शुक्रवारी ११ जणांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. कोरोनाच्या भीतीपोटी अनेक रुग्ण चाचणी करण्यास टाळत असून, काही रुग्ण खासगी रुग्णालयांत ओैषधोपचार घेत आहेत़ एकूणच कोरोनाची साखळी खंडित करण्यात येथील यंत्रणा हतबल असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत तालुक्यात १ हजार ३०४ रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण होते़ पहिल्या लाटेत ३४ नागरिक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले होते़ आरोग्य विभागाने मार्च महिन्यापासून दुसरी लाट ग्राह्य धरली असून, अडीच महिन्यांत तब्बल २ हजार ७३० नागरिकांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत उपचारादरम्यान १९ बाधितांचा मृत्यू झाला. मागील वर्षीच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक संसर्गात भर पडली आहे़ शुक्रवारी दिवसभरात पारा प्राथमिक आरोग्य केंद्रात ६, पारगाव ८, तेरखेडा ७, तर वाशी येथील सीसी सेंटरमध्ये तब्बल ४२ जण कोरोनाबाधित आढळले. याशिवाय आरटीपीसीआर चाचणीत १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने एकाच दिवसात ७८ रुग्णांची नव्याने पडली आहे़
सध्या वाशी शहरातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयतील मुलींच्या वसतिगृहातील सीसी नंबर १ मध्ये ९२, २ नंबरमध्ये १२२, अन्नपूर्णा मंगल कार्यालयात ४१, विठ्ठल स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ११, तर ग्रामीण रुग्णालयाच्या समर्पित कोविड रुग्णालयात केंद्रात २० रुग्ण उपचार घेत आहेत़ तसेच तालुक्यात ७२१ कोरोनाबाधित उपचाराखाली आहेत़ बावी व हातोला येथे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये २२ रुग्ण उपचाराखाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी गोवर्धन महिंद्रकर यांनी दिली़ तालुक्यात तब्बल ४०१ कोरोनाबाधित होमक्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांच्या दैनंदिन अहवालावरून दिसून येत आहे़
चौकट.......
तज्ज्ञांची कमतरता
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील अनेकजण मोकाट फिरत असून याकडे महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे आजच्या अहवालावरून दिसून येते. याशिवाय येथील कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांची जबाबदारीही खासगी डॉक्टरांवर आहे. तालुक्यात एखादा कोरोनाबाधित गंभीर झाला तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टराची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हास्तरावर पाठवण्यात येत आहे. शुक्रवारी देखील ११ रुग्णांना रेफर करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कॉन्सेंट्रेटर मशीन कार्यान्वित
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी येथील व्यापारी संघाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात दोन कॉन्सेंट्रेटर मशीन भेट देण्यात आल्या. यात शुक्रवारपासून कार्यान्वित झाल्याची माहिती व्यापारी संघाचे सचिव अॅड. प्रवीण पवार यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कपिलदेव पाटील यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी ही मशीन उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा रुग्णांना चांगला होईल, अशी संकल्पना व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडली होती़ यानुसार व्यापारी संघाचे सचिव ॲड. प्रवीण पवार, सदस्य सूर्यकांत मोळवणे आदींनी तत्काळ यास मान्यता दिली़ महिनाभरापूर्वी या मशीनचे पैसे संबंधित एजन्सीकडे जमा केल्यानंतर त्या मशीन येथील रुग्णालयात दाखल झाल्या असून, २१ मे पासून त्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत़