४३ गावांत कोरोना रुग्णांची संख्या शून्य, मात्र १२ गावांत चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST2021-06-10T04:22:38+5:302021-06-10T04:22:38+5:30

कळंब : शहर व तालुक्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गबाधितांचा आकडा साडेचार हजारांच्या घरात पोहोचला आहे. सध्या तालुक्यातील ...

The number of corona patients is zero in 43 villages, but anxiety remains in 12 villages | ४३ गावांत कोरोना रुग्णांची संख्या शून्य, मात्र १२ गावांत चिंता कायम

४३ गावांत कोरोना रुग्णांची संख्या शून्य, मात्र १२ गावांत चिंता कायम

कळंब : शहर व तालुक्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गबाधितांचा आकडा साडेचार हजारांच्या घरात पोहोचला आहे. सध्या तालुक्यातील ४३ गावांतील उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या झिरो असली तरी पाचच्या पुढे ॲक्टिव्ह रुग्ण असलेल्या गावांची संख्या १२ असल्याने धोका अजून कायम असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ४ हजार ३०७ जण बाधित झाले. त्यातील एकट्या कळंब शहरातील बाधितांची संख्या हजाराच्या पुढे म्हणजे १ हजार ४४ आहे. ग्रामीण भागात ३ हजार २६३ जणांना कोरोनाने गाठले. कोरोनाने मृत पावलेल्यांची संख्या आता १०३ वर पोहोचली आहे.

तालुक्यातील ९२ पैकी ४३ गावांत सध्या कोरोनाबाधित असलेल्यांची संख्या झिरो आहे. मात्र, ५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावामध्ये कळंब शहर १९, गंभीरवाडी १७, शिंगोली ६, एकुरगा १०, मस्सा खं ६, ईटकूर ७, शिराढोण १४, भोगजी ९, आंदोरा ९, दहिफळ ६, रत्नापूर ७, जवळा ६ या गावांचा समावेश आहे. बुधवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालयात १२, आयटीआय वसतिगृह कोविड सेंटर ५९, रायगड मंगल कार्यालय १५, मोहेकर वसतिगृहावर २३, तर गृह विलगीकरणात ९३ जण उपचार घेत आहेत.

दुसऱ्या टप्प्यात कळंब शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले होते. शिराढोण येथे १०१, तर मोहा येथे १२४ कोरोनाबाधित आढळून आले. तालुक्यात या दोन गावांनी कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण केले असले तरी डिकसळ ५०, तांदूळवाडी ५०, हासेगाव (के) ५२, घारगाव ६२, कन्हेरवाडी ८४, पिंपळगाव (डो) ५७, मंगरूळ ६५, येरमाळा ८५, हावरगाव ५९, लोहटा (पू) ६०, माळकरंजा ५३, करंजकल्ला ५४, खामसवाडी ७५, गोविंदपूर ७० या गावांनीही अर्धशतक पूर्ण केले.

चौकट......

ग्रामीण भागात होतेय गैरसोय

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तविली जात आहेत. त्यामुळे आगामी काळात शासन, प्रशासनाबरोबरच शहरी भागात नगरपरिषद व ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांनी आताच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात कोविड उपचार केंद्र नसल्याने कोरोना रुग्णांबरोबरच कुटुंबीयांनाही धावपळ करावी लागते आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात आगामी काळात कोरोनाचा उद्रेक झाला, तर कोविड उपचार केंद्रे चालू करण्याची तयारी प्रशासनाने आताच हाती घ्यावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

Web Title: The number of corona patients is zero in 43 villages, but anxiety remains in 12 villages