आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:32+5:302021-06-28T04:22:32+5:30
उमरगा : कोरोनाचे ग्रहण हटण्याची चिन्हे दिसत नसून, याचा सर्वात जास्त परिणाम हॉटेल व्यावसायिक व हॉटेल कर्मचाऱ्यांवर झाला आहे. ...

आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद
उमरगा : कोरोनाचे ग्रहण हटण्याची चिन्हे दिसत नसून, याचा सर्वात जास्त परिणाम हॉटेल व्यावसायिक व हॉटेल कर्मचाऱ्यांवर झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे व्यवसाय जवळपास बंद ठेवावे लागले आहेत. दोन महिन्यांपासून बंद असलेले दैनंदिन व्यवहार कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सुरळीत होत असतानाच परत तिसऱ्या लाटेमुळे राज्यात निर्बंध लागू करण्यात आले. परिणामी परत एकदा हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
उमरगा शहर महामार्गावर वसलेले असून, शहरात व शहराबाहेरील महामार्गावर जवळपास दोनशे हॉटेल आहेत. कोरोना संसर्गामुळे मागील वर्षापासून ही सर्वच हॉटेल बंद आहेत. कित्येक हॉटेल व्यावसायिकानी कर्ज काढून हॉटेल सुरू केला. तसेच हॉटेलचा किराया, वीजबिल, कामगार, आचारी यांच्या पगारी, व्यवस्थापनावरील खर्च, असा पसारा त्यांना संभाळणे अशक्य ठरत आहे. यातून कित्येकांनी हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या हॉटेलात काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. उमरगा येथील हॉटेलात जवळपास दोन हजार हॉटेल कामगार असून त्यात आचारी, वेटर व इतर कामगारांचा समावेश आहे. हॉटेल बंद असल्याने हॉटेल मालकाने बहुतांश कामगारांना तात्पुरते कामावरून कमी केले असून, सध्या त्यांना उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
चौकट........
सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता राहणार
राज्यात लागू झालेल्या नव्या निर्बधानुसार आता सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने हॉटेल चालू ठेवावे लागणार आहेत. परंतु, मुळातच आता कुठे हॉटेल सुरू झाले आहेत. त्यात ग्राहक कमी असून, होम डिलिव्हरी सुरू ठेवून हॉटेल चालविणे अशक्य आहे. नागरिकाकडून होम डिलिव्हरीसाठी अत्यल्प मागणी होते. त्यामुळे हॉटेल चालू ठेवणे परवडणारे नाही. व्यवसाय बंद झाल्याने काही हॉटेल चालकांसह तेथील कामगारांवर देखील आता बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
=======
गेली वर्षभर माझे हॉटेल बंद आहे. माझ्याकडील कामगार गेली दहा वर्षापासून काम करीत आहेत. यामुळे त्यांना कामावरून कमी करणे शक्य नाही. कोणतेही काम नसताना त्यांना अर्ध्या पगारी सुरू ठेवल्या आहेत. यासोबतच हॉटेलचे भाडे, वीजबिल व इतर खर्चाचा नाहक भुर्दंड मी वर्षभर सहन केला. मात्र, यापुढे अशीच परिस्थिती राहिल्यास हॉटेल चालविणे शक्य होणार नाही.
- नागेश पुजारी, हॉटेल मालक, उमरगा
======
गेली वर्षभर माझे हॉटेल बंद असून, हॉटेल भाडे, कामगार पगारी, वीजबिल याचा खर्च परवडेनासा झाला आहे. आगामी काळातही अशीच परिस्थिती राहिल्यास हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सरकारने आमचाही विचार करून मदत करावी तसेच नियमात शिथिलता करावी. त्याशिवाय हॉटेल व्यवसाय तग धरू शकत नाहीत.
- किशोर कांबळे, हॉटेल व्यवसायिक, उमरगा
========
हॉटेल बंद असल्याने मालकाने कामावरून काढून टाकले. त्यामुळे गेली वर्षभर मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवित आहे. परंतु, दररोज काम मिळत नाही. सध्या आर्थिक स्थिती अंत्यत बिकट झाली आहे. हॉटेलमधील काम सुटल्याने हाताला कायमस्वरूपी काम नाही. तरी सरकारने आमचा विचार करून मदत करावी.
- भास्कर गायकवाड, हॉटेल कामगार
========
मागील वर्षभरापासून हॉटेल बंद होते त्यामुळे कामावर नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न आहे. मिळेल ते काम करीत असलो तरी हॉटेलमध्ये काम करीत असताना कायमस्वरूपी काम व महिन्याला पगार मिळत होती. आता हॉटेल चालू असले तरी कमी मनुष्यबळावर चालविले जात आहेत. दुसरे कोणते काम येत नाही.
-