यंदा ना ज्वारीची चिंता ना कडब्याची....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:41+5:302021-02-06T04:59:41+5:30
(फोटो - बाबू खामकर ०४) पाथरूड : गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. ...

यंदा ना ज्वारीची चिंता ना कडब्याची....
(फोटो - बाबू खामकर ०४)
पाथरूड : गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. याचा रब्बी हंगामातील महत्त्वाच्या ज्वारी पिकाला चांगला फायदा झाला असून, भूम तालुक्यातील ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाथरूड परिसरातील सुमारे ५ हजार हेक्टरवरील पिकातून १२ हजार ५०० टन ज्वारीसह भरघोस कडबा चाऱ्याचेही उत्पादन निघण्याचा अंदाज शेतकऱ्यांतून वर्तविला जात आहे. विशेषत: सर्वाधिक पेरणी झालेल्या झूट, सफेद गंगा या पांढ-याशुभ्र ज्वारीच्या वाणाला अधिकची मागणी दिसून येत आहे.
पाथरूड परिसरात सुमारे ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झूट, सफेदगंगा या पांढऱ्याशुभ्र जातीच्या ज्वारीची पेरणी झाली आहे. सध्या पीक जोमदार असून, परिसरातील आनंदवाडी, सावरगाव या भागात ज्वारीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. एकरी १० ते १५ क्विंटल तर हेक्टरी २५ क्विंटलपर्यंत उतार मिळत आहे. शिवाय, हेक्टरी १ हजार कडबा पेंड्याचे उत्पादन हाती येत आहे. यावर्षी पाथरूड परिसरात एकूण सरासरी ५ हेक्टर क्षेत्रातून सुमारे १२ हजार ५०० टन ज्वारीचे उत्पादन निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कडब्याच्याही ५० लाखांहून अधिक कडबा (वैरण पेंड्या) निघण्याचा अंदाज आहे. यामुळे यंदा ज्वारी पिकातून ज्वारीसह कडब्याचे भरघोस उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. या माध्यमातून परिसरातील पशुधनांना वर्षभर पुरेल इतका चारा उपलब्ध होणार असल्याने चाऱ्याची टंचाईही भासणार नाही.
सध्या परिसरातील आनंदवाडी भागात काही प्रमाणात ज्वारीची काढणी सुरू झाली असून, काही शेतकरी ज्वारी विक्रीसही पाठवू लागले आहेत. बाजारात झूट, सफेद गंगा या ज्वारीला ४ हजार २०० रुपयांपर्यंत भाव आहे. झूट सफेदगंगा या पांढऱ्याशुभ्र ज्वारीला जास्तीचा दर मिळत आहे. एकंदरीतच यंदा चांगल्या पर्जन्यमानमुळे ज्वारी पिकास वेळेवर सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने ज्वारीच्या चिपाडाची उंचीदेखील १३ फुटांपर्यंत वाढली आहे. पाथरूड परिसरातील ज्वारीला पाथरूड, खर्डा, बार्शी या मुख्य आडत दुकानांमधील व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असते. एकूणच यंदा ज्वारी उत्पादनातून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असल्याचे दिसत आहे.
(चाैकट)
यंदा पाऊस चांगला झाल्याने ज्वारी पिकास वेळेवर पाणी देता आल्याने ज्वारीसह कडब्याचे चांगले उत्पादन निघण्याचा अंदाज आहे.
- काशिनाथ कानडे
मजुरी वाढली
सध्या परिसरात सुरुवातीला पेरणी केलेल्या ज्वारीच्या पिकाची अनेक ठिकाणी काढणी सुरू झाली आहे. परंतु, ज्वारी काढण्यासाठी बाहेर गावातून मजूर वाहनाने आणावे लागत आहेत. मजुरांना प्रती मजूर ३०० ते ४०० रोजंदारी तसेच वाहनाचा ने-आण खर्च करावा लागत आहे. त्यामुळे ज्वारी काढण्यासाठी मजुरांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने वाढलेला खर्च शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
पशुधनांच्या चाऱ्याची होणार सोय
भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय केला जात असल्याने ७ ते ८ हजार पशुधनांची संख्या आहे. दुष्काळात येथील जनावरांना चारा छावण्यांच्या माध्यमातून परजिल्ह्यातून ऊस आणून पशूंची भूक भागवावी लागली होती. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात कडब्याचे उत्पादन होणार असल्याने जनावरांच्या चाऱ्याची चांगली सोय परिसरातच होणार आहे.