बिल भरूनही वीजजोडणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST2021-04-01T04:33:15+5:302021-04-01T04:33:15+5:30

तामलवाडी : महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी तोडलेली वीज बिलाचा भरणा करूनही जोडली जात नसल्यामुळे चार गावच्या ग्रामस्थांना सध्या तीव्र ...

No electricity connection even after paying the bill | बिल भरूनही वीजजोडणी मिळेना

बिल भरूनही वीजजोडणी मिळेना

तामलवाडी : महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी तोडलेली वीज बिलाचा भरणा करूनही जोडली जात नसल्यामुळे चार गावच्या ग्रामस्थांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा शोध घेत ग्रामस्थ भर उन्हात रानोमाळ भटकंती करताना दिसत आहेत.

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या सांगवी, पिंपळा (खुर्द), पिंपळा (बु.) आणि कुंभारी या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरीवरील वीज पंपांचा विद्युत पुरवठा थकीत बिलासाठी महावितरणने खंडित केला आहे. यानंतर ग्रामपंचायतीने बिलाच्या थकबाकीपोटीची रक्कम महावितरण कार्यालयाकडे भरणा केली. त्यास चार दिवस लोटले तरी महावितरणकडून अद्याप ही वीज जोडणी पूर्ववत करण्यात आली नाही. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून या चार गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाण्याचा थेंब नसल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांत महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

झोपडपट्टीवासीयांचे हाल कायम

सांगवी झोपडपट्टी भागात विजेविना चालणारे पाण्याचे एकही स्रोत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना नळाच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते; परंतु महावितरणने येथील पाणीपुरवठ्याची वीजदेखील खंडित केली असून, शेतीपंपासाठी दिवसाकाठी तासभर मिळणारी वीजही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जनावरे, गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीतून घागरीने पाणी काढावे लागत असून, झोपडपट्टीतील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

...तर घागर मोर्चा काढू

ग्रामपंचायतने वीज बिलाची रक्कम भरूनही तीन दिवस झाले; परंतु माळुंब्रा वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता पी. एन. कावरे हे वीज जोडणीचे आदेश देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहेत. याबाबत राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडेदेखील तक्रार केली आहे. महावितरणने तात्काळ वीजपुरवठा जोडून न दिल्यास कार्यालयावर घागर मोर्चा काढू, असा इशारा सांगवीचे उपसरपंच मिलिंद मगर यांनी दिला आहे.

कोट....

माझी सांगवी शिवारात स्वत:ची शेतजमीन, विहीर असून, शेतीपंपासाठी अनामत रक्कम भरल्यानंतर महावितरणने तीन वर्षांपूर्वी खांब उभारून तारा ओढल्या; परंतु अद्यापही वीजजोडणी दिलेली नाही. त्यामुळे विहिरीतून घागरीने पाणी उपसून जनावरांची तहान भागवावी लागत आहे.

- ज्ञानेश्वर मगर,

शेतकरी सांगवी (काटी)

Web Title: No electricity connection even after paying the bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.