जिल्ह्यात तीन दिवसांत लसीचा एकही डोस गेला नाही वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST2021-01-22T04:29:33+5:302021-01-22T04:29:33+5:30
उस्मानाबाद : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस मागील आठवड्यात आरोग्य विभागाकडे दाखल झाली. १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष ...

जिल्ह्यात तीन दिवसांत लसीचा एकही डोस गेला नाही वाया
उस्मानाबाद : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस मागील आठवड्यात आरोग्य विभागाकडे दाखल झाली. १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभ झाला आहे. मागील तीन दिवसांत ४७३ जणांना डोस देण्यात आले असून, आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे एकही डोस वाया गेला नाही.
कोरोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे १० हजार ५० डोस जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, स्टाफ नर्स, आशा, अंगणवाडी सेविका, खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात लसीकरणासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय, उमरगा उपजिल्हा रुग्णालय या तीन ठिकाणी लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर प्रतिदिन १०० प्रमाणे लस देण्याची सोय केलेली आहे. पहिल्या दिवशी २१३ व्यक्तींनी लस घेतली. त्यानंतर दोन दिवस लसीकरण मोहीम थांबविण्यात आली होती. १९ जानेवारी रोजी २३६, २० जानेवारी २४० व्यक्तींनी लस घेतली. या कालावधीत आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे एकही डोस वाया गेलेला नाही.
कोट...
घाबरू नका
कोरोना लस ही फायदेशीर असून, उस्मानाबाद जिल्ह्यात काही जणांना सौम्य प्रकारची रिॲक्शन आली होती.
लस दिल्यानंतर ताप येणे, उलट्या, मळमळ, असा त्रास काही जणांना जाणवू लागतो. लसीकरणानंतर असे घडणे अपेक्षित आहे. रिॲक्शन आली तरच लस काम करीत असल्याचा सिग्नल मिळतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता लस टोचून घेणे गरजेचे आहे.
-डॉ. सचिन बोडके, निवासी वैद्यकी अधिकारी
चौकट...
एका बाटलीत १० डोस
लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते, तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वेस्टेज जातात.
पाॅइंटर...
१०,०५० डोस मिळाले
०००० डोस गेले वाया
४७३ जणांना दिले पहिल्या तीन दिवसांत डाेस
१२७ जण राहिले अनुपस्थित