गरज डाॅक्टरांची अन् नेमणूक केली शिपायाची...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST2021-05-16T04:32:12+5:302021-05-16T04:32:12+5:30
सहा हजार लोकसंख्येच्या मस्सा खं. गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने उपकेंद्र ...

गरज डाॅक्टरांची अन् नेमणूक केली शिपायाची...
सहा हजार लोकसंख्येच्या मस्सा खं. गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने उपकेंद्र व युनानी दवाखाना उभारण्यात आला आहे. परंतु, मागच्या काही वर्षांपासून या दोन्ही दवाखान्यात आकृतीबंधानुसार कधीच आरोग्य कर्मचारी नियुक्त नसतात.
यामुळे या दवाखान्याच्या केवळ इमारती उभ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्या इमारती सामान्य नागरिकांसाठी ‘डॉक्टर नसलेला दवाखाना’ ठरत आहेत. यामुळे ना लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात, ना योग्यवेळी योग्य ती संदर्भसेवा. एकूणच डॉक्टर, कंपाउंडर, आरोग्य सेविका अशी पदे महिनोनमहिने रिक्त राहत असल्याने हे दोन्ही दवाखाने ‘असून अडचण, नसून खोळंबा’ ठरत आहेत.
याच अनुषंगाने मागच्या पंधरा दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर आणत ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय प्रकर्षाने मांडली होती. यानंतर युनानी दवाखान्यात डॉक्टरांची नियुक्ती अपेक्षित असताना नियुक्ती झाली आहे ती शिपायाची. ती पण तात्पुरत्या प्रतिनियुक्ती स्वरूपात. यामुळे मूळ समस्यांवर मार्ग काढण्यास वरिष्ठ दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
चौकट...
मस्सा येथील युनानी दवाखाना आजवर अनेकांना मोठा आधार ठरला असला तरी मागच्या अनेक महिन्यांपासून येथे डॉक्टरांची वानवा आहे. यातच औषध निर्माता प्रतिनियुक्तीवर आहे. या स्थितीत येथे डॉक्टरांची गरज असताना प्रशासनाने कळंब येथील एका शिपायाची प्रतिनियुक्ती केली आहे. यामुळे ज्या दवाखान्याला डॉक्टरांची गरज आहे, तेथे शिपायाची नियुक्ती केली आहे.
नियुक्ती मस्सा येथे, कार्यरत मोह्यात...
मस्सा खं. येथील आरोग्य केंद्रात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर भरण्यात आले नाहीत. या स्थितीत येथील आरोग्य सेविकांना मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिनियुक्तीवर नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे नियुक्ती मस्सा येथे अन् ड्युटी मोह्यात, असा अजब प्रकार सध्या सुरू आहे. यामुळे उपकेंद्राचाही ग्रामस्थांना म्हणावा तसा लाभ होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
प्रतिनियुक्ती रद्द करा...
मस्सा येथील सरपंच प्रा. राजश्री धनंजय वरपे यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र देऊन नर्स, स्टाफ नसलेल्या या दवाखान्याचा ग्रामस्थांना उपयोग होत नाही. यामुळे येथील कार्यरत आरोग्य सेविकांना मोहा येथे दिलेले डेप्युटेशन रद्द करावे, अशी मागणी केली आहे.