राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद, लातुरात बळाची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST2021-06-24T04:22:46+5:302021-06-24T04:22:46+5:30
उस्मानाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच आपल्या बळाची चाचपणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री ...

राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद, लातुरात बळाची चाचपणी
उस्मानाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच आपल्या बळाची चाचपणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यापाठोपाठ आता जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज उस्मानाबादच्या मुक्कामी दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात पक्षाच्या झालेल्या वाताहतीच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत.
माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही पुरेसी सावरलेली दिसत नाही. पक्षातील दुसरा बडा चेहरा माजी आ. राहुल मोटे यांनी पक्ष सावरण्यात लीड घेतली नाही. परिणामी, पक्ष गोठलेल्या अवस्थेत आहे. पुढच्या नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे नगारे वाजतील. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १८ जून रोजी शासकीय दौऱ्यातून वेळ काढत राहुल मोटे यांच्याकडे गिरवलीत वेळ व्यतित केला. पदाधिकाऱ्यांच्याही येथेच भेटी घेऊन बळ देण्याचा प्रयत्न केला. यापाठोपाठ आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे २४ जून रोजी उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते दिवसभर सर्वच चारही विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेणार आहेत. जिल्हा कार्यकारिणीशी संवाद साधणार आहेत. शिवाय, मुक्कामी थांबून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेणार आहेत. यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बळाची चाचपणी केली जाणार आहे. नंतर ते २५ जून रोजी लातूर जिल्ह्याकडे रवाना होत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या उस्मानाबादला होत असलेल्या चकरा कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या ठरतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरते आहे.