राष्ट्रीय महामार्गाची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:18+5:302021-08-19T04:35:18+5:30
मुरुम फाटा ते अक्कलकोट हा केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग म्हणून नव्याने घोषित झाला आहे. यापूर्वी हा रस्ता राज्यमार्ग होता. ...

राष्ट्रीय महामार्गाची चाळण
मुरुम फाटा ते अक्कलकोट हा केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग म्हणून नव्याने घोषित झाला आहे. यापूर्वी हा रस्ता राज्यमार्ग होता. या रस्त्यावर मागील वर्षभरापासून अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत. संपूर्ण रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांना आपले अंग मोकळे करुन घ्यावे लागत आहे. या रस्त्यावरुन उमरगा, अक्कलकोट, आळंद, लातूर, भोकर, पुणे, मुंबई, पाथरी आदी आगाराच्या दिवसभरात पन्नास बस फेऱ्यांची ये-जा असते. पुढे हा रस्ता अक्कलकोट व उमरगा या गावांना जातो. दोन्ही गावे तालुक्याचे ठिकाण असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच कर्नाटकातील आळंद व इंडी तालुक्यालाही हा रस्ता पुढे जातो.
दरम्यान, अतिवृष्टी आणि वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची मागील वर्षभरापासून चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनांची आदळआपट मोठ्या प्रमाणात होत आहे. मुरुम ते बोळेगाव पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी धोकादायक खड्डे पडले आहेत. मुरुम ते बेळंबचे अंतर केवळ पाच किलोमीटरचे आहे. रस्ता चांगला झाल्यास केवळ पाच मिनिटात मुरुमला प्रवाशांना जाता येईल. मात्र, सध्या खड्ड्यामुळे प्रवाशांना पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागत आहे. रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल ; तोपर्यंत महामार्ग विभागाने किमान रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
वर्कऑर्डर मिळेना
मुरुम फाटा ते अक्कलकोट मार्गे हा रस्ता कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला जोडला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील वागदरी ते अक्कलकोट दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम फाटा ते बोळेगावच्या सीमेपर्यंत रस्त्याचे काम मात्र वर्कर ऑर्डर अभावी रखडले आहे. हा रस्ता झाल्यानंतर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गाणगापूर येथील दत्त मंदिर कर्नाटकातील विजापूर येथील गोलगुम्मट, अलमट्टी डॅम, तसेच मराठवाड्यातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला जोडला जाणार आहे. शिवाय कर्नाटकातील बीदर, कलबुर्गी आणि आंध्रप्रदेशातील नारायणपेठ, महीबुबनगर, संग्गारेड्डी आदी जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे.
कोट.......
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराला या कामाची वर्क ऑर्डर अद्यापपर्यंत मिळालेली नाही. ऑगस्ट अखेरपर्यंत ती मिळण्याची शक्यता आहे. जवळपास ७० कोटी रुपयांचे हे काम आहे. मुरुम फाटा ते मुरुमपर्यंत १० मीटर तर मुरुम ते बोळेगाव या उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेपर्यंत ७ मीटरने रस्ता वाढणार आहे.
- विजय स्वामी, कनिष्ठ अभियंता, सोलापूर महामार्ग विभाग