राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST2021-02-12T04:30:51+5:302021-02-12T04:30:51+5:30

उमरगा : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेले महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. महामार्गावरील गावात सुरक्षिततेच्या दृष्टीने ...

The national highway became a death trap | राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

उमरगा : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेले महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. महामार्गावरील गावात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, महामार्गावर निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने वारंवार खड्डे पडत असून, त्याच्या दुरुस्तीला विलंब होत आहे. विशेषत: येळी, शिवाजीनगर तांडा, दाळिंब, येणेगूर, मुरुममोड आदी ठिकाणचे महामार्गावरील खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत.

उस्मानाबाद जिल्हा हद्दीतील खानापूरपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंतच्या शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणाच्या कामाची मूळ किंमत ९२२ कोटी आहे. चौपदरीकरणाच्या कामाबाबतच्या सर्व्हे २०११ पासून सुरू झाला होता. २०१३ मध्ये कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सोलापूरच्या एसटीपीएल कंपनीने कामाचा ठेका घेतला. शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणासाठी जवळपास तीनशे हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम अजूनही चालूच असून, रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर सहा महिन्यांत पुन्हा खड्डे पडायला सुरुवात होते. डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी मुरूम मोड, आष्टामोड, जकेकूर चौरस्ता, मुळज फाटा, येणेगूर येथील उड्डाणपुलांचे काम रखडले आहे. दाळिंब गावात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. चौपदरीकरणाचे डांबरीकरण झालेले असले तरी महामार्गावर अनेक ठिकाणी अडथळे कायम आहेत. काही ठिकाणी नव्याने झालेले काम उखडल्याचेही दिसून येते. आष्टामोड, येणेगूर, मुरूम मोड, तुरोरीजवळील मुळज फाट्यावरील उड्डाणपुलाचे काम रखडले असून, दाळिंब, येळी गावातही सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. धोकादायक ठिकाण असलेल्या बलसूर मोड येथे भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची मागणी करूनही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दखल घेतली गेली नाही. ऐन महामार्गालगत असलेल्या जकेकूर गावातही सुरक्षित मार्ग नसल्याने अपघात होत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी उपाययोजना नसतानाही सहा महिन्यांपासून ईटकळ व तलमोड गावाजवळील दोन टोल नाक्यांवर टोल वसुली सुरू असल्याने वाहनधारकांत संताप व्यक्त होत आहे.

अपघात वाढले

दाबका ग्रामस्थांनी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल करण्याच्या मागणीसाठी रस्त्याचे काम अडवले होते. मात्र, सुरक्षितेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करता दडपशाहीने डांबरीकरणाचे काम आटोपण्यात आले आहे. दरम्यान, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून, आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त लोकांचा येथे अपघाती मृत्यू झाला आहे. याशिवाय, अनेकांना अपंगत्व आले आहे.

फोटो-राष्ट्रीय महामार्गावर दस्तापूर येथे असे मोठे खड्डे पडले आहेत.

Web Title: The national highway became a death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.