अरूंद रस्त्यामुळे अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST2021-03-04T05:00:10+5:302021-03-04T05:00:10+5:30
(फोटो : राहुल ओमने २) शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील जिल्हा मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु, ...

अरूंद रस्त्यामुळे अपघात वाढले
(फोटो : राहुल ओमने २)
शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील जिल्हा मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु, काही ठिकाणी रस्ता अरूंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे साईडपट्ट्याचे काम करून रस्त्याची रूंदी वाढवावी, अशी मागणी होत आहे.
शिराढोण परिसरात नॅचरल शुगर, स्टील कारखाने तसेच दूध डेअरी आदी छोटे-मोठे व्यवसाय असल्याने सतत अवजड वाहनाची वर्दळ असते. शिवाय परिसरातील बारा गावासाठी जिल्ह्याला जाणारा शिराढोण-कोलेगाव हा मार्ग असून, या रस्त्याची लांबी पंधरा किमी आहे. यापैकी सहा किमी अंतरापर्यंत रस्ता मोठा असला तरी उर्वरित जवळपास नऊ किमी अंतराचा रस्ता अरूंद आहे. यात शिराढोण शिवारात दोन किमी तर निपाणी फाटा ते कोलेगाव या सहा किमी रस्त्याचा समावेश आहे. या अरूंद रस्त्यावर एकाच वेळी दोन वाहने समोरासमोर आल्यास एकाला रस्त्याच्या खाली उतरावे लागते. अनेकदा रस्त्याच्या खाली कोण उतरणार हे लवकर ठरत नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे या अरूंद रस्त्यावर चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
कोट.......
या रस्त्यावर अवजड वाहनाची सातत्याने वाहतूक सुरु असते. परंतु, अरूंद रस्त्यामुळे वाहन चालविणे धोक्याचे होत आहे. संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घ्यावे.
- गंगाधर सोमासे, शिराढोण
जिल्हा मार्गाची रूंदी वाढविण्याबाबतचे अंदाजपत्रक वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. त्यामुळे यास मंजुरी मिळताच पहिल्या टप्प्यात शिराढोण शिवारातील रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे.
- जी. एन. चितळे, अभियंता कळंब