राजकीय वैमनस्यातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST2021-02-11T04:34:48+5:302021-02-11T04:34:48+5:30
उस्मानाबाद : राजकीय वैमनस्यातून निर्माण झालेल्या वादानंतर कर्नाटकातील एका तरुणास जकेकूर येथे आणून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली ...

राजकीय वैमनस्यातून तरुणाचा खून
उस्मानाबाद : राजकीय वैमनस्यातून निर्माण झालेल्या वादानंतर कर्नाटकातील एका तरुणास जकेकूर येथे आणून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंगळवारी उमरगा ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
उमरगा तालुक्याच्या शेजारीच असलेल्या कर्नाटकातील आळंद तालुक्यातील खजुरी येथील संतोष ईरण्णा सावळेश्वर (३२) असे या घटनेत मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या युवकात व गावातीलच संजयकुमार शिवपुत्र हुगार, भीमाशंकर करबसप्पा तळवार यांच्यासोबत राजकीय मतभेद निर्माण झाले होते, यातून त्यांच्यात वादही झाला होता. त्यामुळे तळवार व हुगार यांनी संतोषचा काटा काढण्याचे ठरविले. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संतोषला या दोघांनी बैल खरेदीच्या बहाण्याने खजुरी येथून उमरगा तालुक्यातील जकेकूर येथे असलेल्या वृद्धाश्रमासमोर आणले. येथे त्यांनी अवजड वस्तूने मारहाण करून संतोषला गंभीर जखमी केले. नंतर तो अपघातात जखमी झाल्याचे भासवून या दोघांनीच त्याला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना संतोषचा मृत्यू झाला. यानंतर, त्याची आई विजयाबाई सावयश्वर यांनी मंगळवारी उमरगा ठाणे गाठत हुगार व तळवार यांच्याविरुद्ध खुनाची तक्रार दिली. त्याप्रमाणे, या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.