एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:26+5:302021-07-07T04:40:26+5:30
गुणवंत जाधवर उमरगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य पूर्व परीक्षा तब्बल पाचवेळा पुढे ढकलून इतिहास रचला आहेच. ...

एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर
गुणवंत जाधवर
उमरगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य पूर्व परीक्षा तब्बल पाचवेळा पुढे ढकलून इतिहास रचला आहेच. मात्र, यंदा परीक्षा होणार आहेत की नाहीत, हे स्पष्ट केले नाही. यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार? ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार, असे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहेत. क्लासेसला परवानगी न दिल्याने स्पर्धा परीक्षेचे क्लासही सध्या ऑनलाइन सुरू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून हेच सुरू आहे. वय निघून चालल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढत असून, क्लासचालकदेखील अडचणीत आले आहेत.
मार्च २०२१ मध्ये परीक्षा घेऊन कोरोनासारख्या संकटातदेखील चांगल्या प्रकारे परीक्षा घेता येते, हे एमपीएससीने दाखून दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता फार काळ विचार न करता संबंधित विभागाच्या रिक्त जागांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवावे. त्यामुळे वेळापत्रक जाहीर होऊन अभ्यास करता येईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कोरोना आणि आरक्षणामुळे गेल्या दोन वर्षांत भरतीप्रक्रिया रखडली, वय वाढल्याने संधी हुकली. यासाठी वयोमर्यादा वाढविण्याबाबत केवळ घोषणा झाली, मात्र निर्णय नाही. विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढला असून, भविष्य धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे. अनिश्चित भरती प्रक्रियेमुळे आयुष्याचे गणित बिघडल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?
राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे रिक्त पदांचे मागणीपत्रच पाठविले नसल्याने यंदाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही, असा आरोप केला जात आहे. यावर्षी परीक्षा होणार आहेत की नाहीत, या प्रश्नावरून विद्यार्थी चिंतेत आहेत. सर्वसाधारणपणे एमपीएससीने २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक डिसेंबरमध्येच जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही यंदा परीक्षा होणार आहेत की नाहीत, हे स्पष्ट केले नाही.
ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार?
मार्च २०२०पासून कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व शिक्षण व्यवस्था ठप्प झाली आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वात पहिला निर्णय कोचिंग क्लास बंद करण्याचा घेतला.
क्लासेस बंद असल्यामुळे क्लास चालक, कर्मचारी, प्रकाशक, खानावळचालक, पुस्तक विक्रेते आदी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
त्यामुळे ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-------------------------------------------
विद्यार्थ्यांचे वय निघून चालले !
'२०१९ पासून परीक्षा रखडल्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन क्लासेस चालू आहेत. इंटरनेटचा अभाव असल्याने व ऑनलाइन क्लासची फी परवडत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा प्रश्न कठीण झाला आहे. मी स्वतः ४ वर्षांपासून एमपीएससीची तयारी करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही परीक्षा न दिल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वय निघून जात असल्याने मानसिक तणाव वाढत आहे.
- सूरज शाहुराज चव्हाण, विद्यार्थी
२०१९ मध्ये पोलीस भरतीसाठी शासनाने फार्म भरून घेतले आहेत. मात्र, आजपर्यंत त्याची परीक्षा झाली नाही. विद्यार्थ्यांचे वयही संपून जात आहे. पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार हे सर्वसाधारण आणि शेतकरी कुटुंबातील जास्तीत जास्त असतात. त्यामुळे आर्थिक परिस्थितीही कमकुवत असते. अश्या परिस्थितीत क्लास करणेही परवडत नाही. त्यामुळे शासनाने विचार करून लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात.
- विशाल सोलनकर, परीक्षार्थी
क्लासचालकही अडचणीत
मार्च २०२० पासून कोरोनामुळे सर्व कोचिंग क्लास बंद आहेत. एमपीएससी परीक्षा पाच वेळा पुढे ढकलली, यात राज्यसेवा व दुय्यम सेवा या परीक्षा पुढे रेटल्या, पोलीस भरती २०१७ पासून झाली नाही. फॉर्म मात्र दोन वेळा भरून घेतले. आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या, त्याही परीक्षा पेपर फुटीमुळं रद्द झाल्या. साधरण: मागील तीन वर्षात भरती नाही. पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व- मुख्य परीक्षा झाली असली तरी अजून मैदानी चाचणी झाली नाही. जे विद्यार्थी राज्यसेवा २०२० मध्ये पात्र झाले त्यांना अजून ऑर्डर दिली गेली नाही. विद्यार्थी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची दहा-दहा वर्ष घालतात. परंतु, या गोंधळामुळे ते निराश होऊन वाईट मार्ग निवडतात.
- डॉ. राम जाधव, क्लास चालक.
गेल्या दीड वर्षापासून ऑफलाइन क्लासेस बंद आहेत. ऑनलाइन परवानगी असली तरी विद्यार्थ्यांची मागणी ऑफलाइनची आहे. क्लासेस बंद असल्यामुळे शिक्षक, क्लासचालक, कर्मचारी, प्रकाशक आदी घटक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परीक्षा होत नसल्यामुळे तसेच आगामी परीक्षेच्या तारखादेखील जाहीर होत नसल्यामुळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने अडचणीत आहे. शासनाने आगामी परीक्षेच्या तारखा जाहीर करून परीक्षा वेळेवर घ्याव्यात.
-देवा जाधवर, लेखक स्पर्धा परीक्षा.