काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: August 25, 2016 01:01 IST2016-08-25T00:51:11+5:302016-08-25T01:01:14+5:30
उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावे,

काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांचे आंदोलन
उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बुधवारपासून काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन ३१ आॅगस्टपर्यंत चालणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये मागील आठ ते दहा वर्षांपासून कंत्राटी तत्वावर अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, सदरील कर्मचाऱ्यांना मार्च २०१७ नंतर पुनर्नियुक्ती देण्यात येवू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर आता बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. यातील अनेक कर्मचारी एजबार झाले आहेत. सदरील बाब लक्षात घेऊन शासनाने अभियानातील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत देण्यात आलेल्या वेतनवाढीप्रमाणे वेतनवाढ द्यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण लागू करावे, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय रजा लागू कराव्यात यासह आदी मागण्यांसाठी २४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येत आहे. तसेच २९ ते ३१ आॅगस्ट दरम्यान आमदार, खासदार यांच्या घरावर मोर्चा काढला जाईल. २ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर रोजी लाक्षणिक कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. आॅक्टोबर महिन्यात संपूर्ण रिपोर्टींग बंद करण्यात येणार आहे. २ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल. आणि डिसेंबर किंवा जानेवारी २०१७ पासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)