विनयभंगाच्या गुन्ह्यातील महाराजाच्या अटकेसाठी बळीराजा पार्टीचे धरणे आंदोलन
By सूरज पाचपिंडे | Updated: August 29, 2022 17:22 IST2022-08-29T17:21:47+5:302022-08-29T17:22:02+5:30
मलकापूर येथील हभप एकनाथ लोमटे महाराज यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिली आहे

विनयभंगाच्या गुन्ह्यातील महाराजाच्या अटकेसाठी बळीराजा पार्टीचे धरणे आंदोलन
सुरज पाचपिंडे/ उस्मानाबाद
उस्मानाबाद : विनयभंगाचा आरोप असलेल्या मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराज यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी बळीराजा पार्टीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, मलकापूर येथील हभप एकनाथ लोमटे महाराज यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिली आहे, त्यानुसार गुन्हाही नोंद झाला आहे. परंतु, आजतागायत लोमटे महाराजांना अटक करण्यात आलेली नाही. महाराजांना अटक करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, अद्यापही कार्यवाही झाली नसल्याने आंदोलनास बसावे लागले.
येत्या काही दिवसात गुन्हा दाखल असलेल्या महाराजास अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आंदोलनात बळीराजा पार्टीचे महाराष्ट्र महासचिव बाळासाहेब रास्त, मराठवाडा अध्यक्ष अच्युत पुरी, जिल्हाध्यक्ष तात्या रोडे, जिल्हा महासचिव महादेव कांबळे आदी सहभागी होते.