बहुतांश ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:32 IST2021-01-20T04:32:21+5:302021-01-20T04:32:21+5:30

(फोटो - सुशिल शुक्ला १९) परंडा : तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या ४७९ जागेच्या निवडणूक निकालात बहुतांश ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी पॅटर्नचा ...

Most of the Gram Panchayats are in the forefront of development | बहुतांश ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे

बहुतांश ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे

(फोटो - सुशिल शुक्ला १९)

परंडा : तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या ४७९ जागेच्या निवडणूक निकालात बहुतांश ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी पॅटर्नचा ठसा उमटला आहे. काही ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना नवख्या उमेदवारांनी धक्का देत पराभूत केले आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीने पार पडली. निकाल चित्रानुसार अनेक बड्या राजकीय मंडळींना मतदारांनी धक्का देत नवख्यांना संधी दिली. तांदुळवाडी येथे जि. प. माजी उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब खरसडे यांच्या काँग्रेस-शिवसेना आघाडीस राष्ट्रवादीचे बाबासाहेब खरसडे, भाऊसाहेब खरसडे व भाजपाचे ॲड. गणेश खरसडे यांनी पराभूत केले. डोंजा ग्रामपंचायतीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या रेणुका माता विकास आघाडीने २० वर्षापासून सत्तेत असलेल्या गजेंद्र सूर्यवंशी व त्यांचे जावई तथा आ. प्रा. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे यांच्या पॅनलचा धक्कादायक पराभव केला. केवळ रामचंद्र घोगरे एकटेच विजयी झाले तर उर्वरित उमेदवार पराभूत झाले.

सोनारी ग्रामपंचायतीत विद्यमान जि. प. सदस्य राष्ट्रवादीचे नवनाथ जगताप यांनी विजयी पताका फडकविली. येथे राष्ट्रवादीचे माजी जि. प. बांधकाम सभापती दादासाहेब पाटील सोनारीकर व विद्यमान सरपंच भाजपाचे बिभीषण हांगे यांच्या गटास पराभव पत्करावा लागला. तालुक्यातील चिंचपूर (बु.) येथे जि. प. चे माजी सभापती व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्या महाविकास आघाडीचा भाजपाच्या नवख्या उमेदवारांनी पराभव करून इतिहास घडविला. येथे गेली अनेक वर्षे रणजित पाटील यांचा दबदबा होता. त्यांचे चिरंजीव युवराजसिंह पाटील हे विद्यमान उपसरपंच आहेत. कंडारी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जि. प. सदस्य धनंजय मोरे, विद्यमान सरपंच विश्वास मोरे यांच्या ग्रामपंचायत सत्तेला शिवसेनेच्या किरण मोरे या युवा कार्यकर्त्यांनी भेदत प्रस्थापितांना धक्का दिला. मोरे यांचे पूर्ण पॅनल भुईसपाट झाले. लोणी ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे भाजपाचे माजी तालुका प्रमुख व विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे यांच्या ताब्यात होती. किंबहुना तालुक्यातील भाजपाची पहिली ग्रामपंचायत असलेल्या लोणी येथेही शिवसेनेने ‘महाविकास’ साधत टोपेंचा सत्तेचा ‘टेम्पो’ थंड केला. येथे भाजपाला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. गाैतम लटके व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी मार्गे भाजपा असा प्रवास करणारे माजी सरपंच पोपट गोडगे यांना राजुरी येथील नवख्या उमेदवारांनी मतदारांच्या मदतीने आस्मान दाखविले. आवारपिंपरी ग्रामपंचायतीत शिवसेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव यांच्या गटास पराभव पत्कारावा लागला आहे. खासापुरी येथे बालाजी देशमुख या उद्योजकाने स्वत:च्याच भावकीची प्रस्थापित देशमुखी मतदारांच्या मदतीने मोडून काढली. कात्राबाद, सोनगिरी या ग्रामपंचायतीत उद्योजक राजाभाऊ शेळके यांनी अनेक वर्षे सत्तेत असलेल्यांना पराभूत करून वर्चस्व प्रस्थापित केले. आसू ग्रामपंचायतीवर माजी जि. प. सदस्य व बाणगंगाचे संचालक मारूती मासाळ यांनी वर्चस्व राखले. शिवसेनेचे माजी पं. स. सभापतींचे पती शंकर इतापे यांच्या पॅनलचा पराभव करून एकहाती राष्ट्रवादीची सत्ता आणली.

जवळा गटात सेनेच वर्चस्व

वाकडी ग्रामपंचायतीत माजी जि. प. सदस्य धनंजय हांडे यांनी राष्ट्रवादी सत्तेवर आणली. मात्र, वाकडी गाव वगळता जवळा (नि.) जि. प. गटातील जवळा, अरणगाव, टाकळी, बावची, दहिटणा, हिंगणगाव, भांडगाव या ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले. शिरसाव येथेही शिवसेना व मित्र पक्षांनी जिंकल्याचा दावा जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके यांनी केला आहे.

येथे भाजपाचा दावा

पिंपरखेड, देवगाव (बु.), तांदुळवाडी, रोसा, अनाळा, कुक्कडगाव, गोसावीवाडी, चिंचपूर (खु.), काैडगाव, रूई-दुधी या ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळविल्याचा दावा भाजपाचे तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी केला आहे. इतर काही ग्रामपंचायतीत सेनेसोबत भाजपाचेच वर्चस्व आहे, असे पाटील यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काॅंंग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. संदीप पाटील व शिवसेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव निकाल दावेदारीसाठी उपलब्ध झाले नाहीत. ६५ पैकी एकही ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात आलेली नाही किंवा कोणी तसा दावाही केला नाही हे उल्लेखनिय आहे.

Web Title: Most of the Gram Panchayats are in the forefront of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.