पैसा झाला खोटा; दहा रुपयांचे नाणे चालेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST2021-09-21T04:36:36+5:302021-09-21T04:36:36+5:30
कळंब : एखादी अफवा अथवा उडत आलेली बातमी एखाद्याचं अस्तित्व कसं गोत्यात आणू शकते, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून १० ...

पैसा झाला खोटा; दहा रुपयांचे नाणे चालेना !
कळंब : एखादी अफवा अथवा उडत आलेली बातमी एखाद्याचं अस्तित्व कसं गोत्यात आणू शकते, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून १० रुपयांच्या नाण्याकडे पाहावे लागेल. दहा रुपयांचे नाणे दैनंदिन चलनात चालेनासे झाल्याने, या लाखो रुपयांचे करायचे काय, असा प्रश्न आता बँका तसेच व्यापारी वर्गासमोर उभा राहत आहे. या नाण्याचा वापर व्यवहारात होण्यासाठी आता सर्वच यंत्रणांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यातून सुटका होण्यासाठी बँकांतून १० रुपयांचे नाणे घेणे व देणे सुरू करून ते नाकारणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली, तरच त्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकणार आहे.
या नाण्याच्या नशिबी वनवास
१० रुपयांचे नाणे काही वर्षे चलनात चालले, पण अचानक ते बंद केल्याची अफवा पसरली अन् त्या नाण्याची व्यवहारातील स्वीकारार्हता बंद झाली. छोट्या व्यापाऱ्यांनी तर ती नाणी घेणे बंदच केल्याने ग्राहकांनीही मग ते चालत नाहीत, असा सूर लावला. त्यामुळे १० रुपयांच्या नाण्यांच्या नशिबी वनवास आलाय, तो कायमचाच.
चौकट
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
- सचिन ढोमे, बँक व्यवस्थापक
१० रुपयांचे नाणे बंद झाले, ही निव्वळ अफवा आहे. रिझर्व्ह बँकेने अधिकृत केलेले कोणतेही नाणे कोणीही नाकारणे, हा गुन्हा आहे. अशा व्यक्ती, संस्था यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. बँकेच्या व्यवहारात आम्ही चलनातील सर्व नाणी स्वीकारतो. त्यामुळे दहा रुपयांचे नाणेही आम्ही ग्राहकांकडून घेतो. काही मंडळी हे नाणे बंद झाल्याचे सांगून ते स्वीकारत नसतील, तर तो कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे सर्वांनी १० च्या नाण्यांचा व्यवहारात वापर करावा.
- सचिन ढोमे, शाखा व्यवस्थापक, एसबीआय, कळंब
चौकट -
पैसा असून अडचण
१० रुपयांची नाणी आम्ही स्वीकारतो, पण पुढे ती कोणी घेत नाही. त्यामुळे ग्राहक ते बँक असा त्यांचा मर्यादित प्रवास होतो. ती चलनात फिरत नाहीत. परिणामी त्यांचा वापर कमी होतो. ग्रामीण भागातील मंडळी तर त्या नाण्याला हातही लावत नाहीत. शहरी भागातील नागरिकांमध्येही गैरसमज आहेत. त्यासाठी आता बँकांनीच पुढाकार देऊन १० रुपयांच्या चलनाचा व्यवहारात जास्तीत जास्त वापर वाढविण्यास पुढाकार घेण्याची गरज आहे.
- आनंद बलाई, व्यापारी, कळंब
चौकट -
१० रुपयांचे नाणे काही ठिकाणी स्वीकारले जाते, तर काही ठिकाणी नाही. पेट्रोल पंप, सार्वजनिक वाहतूक अशा ठिकाणी ही नाणी स्वीकारली जातात. आम्हीसुद्धा कुरियर, झेरॉक्स यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून ती नाणी घेतो. परंतु, एखाद्याला सुटे म्हणून ते नाणे दिले, तर तो ते स्वीकारण्यास उत्सुक नसतो. त्यामुळे दोन्हीही बाजूने वापर वाढला, तर ते नाणे पुन्हा चलनात मोठ्या प्रमाणात वापरले जाईल.
- संतोष लोखंडे, कळंब
चौकट -
नाण्यात अडकले लाखो रुपये !
१० रुपयांचे नाणे चालत नाही, म्हणून त्याचा व्यवहारात वापर होणे एकदम कमी झाले आहे. कळंब येथील एकट्या एसबीआय या राष्ट्रीयीकृत बँकेत ४ ते ५ लाख रुपयांची रक्कम या नाण्यांत अडकल्याची माहिती आहे.
इतर बँकांत मिळून ही रक्कम कितीच्या घरात जाईल, हे नक्की सांगता येणार नाही. मात्र तो आकडा मोठा असणार आहे. त्यामुळे नाण्यांत अडकून बसलेली ही रक्कम व्यवहारात येत नसल्याने चलन पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत असणार आहे.