‘स्टॉक लिमिट’मुळे मोंढा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:50+5:302021-07-09T04:21:50+5:30
कळंब : महागाईच्या सुसाट गाडीला ब्रेक लावण्यासाठी केंद्राने नुकताच डाळीला ‘स्टॉक लिमिट’ केले. यामुळे मोठी मार्केट बंद आहेत. हा ...

‘स्टॉक लिमिट’मुळे मोंढा बंद
कळंब : महागाईच्या सुसाट गाडीला ब्रेक लावण्यासाठी केंद्राने नुकताच डाळीला ‘स्टॉक लिमिट’ केले. यामुळे मोठी मार्केट बंद आहेत. हा दाखला देत मागच्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ असलेल्या कळंब येथील मोंढ्यातील व्यवहार देखील व्यापाऱ्यांनी बंद ठेवले आहेत.
स्वयंपाक घरात लागणाऱ्या खाद्यान्न प्रवर्गातील अनेक वस्तूंची दरवाढ झाली. यातच किलोला दीडशेपार झालेल्या तेलाचा ‘तडका’ काय कमी होता, तो इंधन दरवाढीचा ‘भडका’ झाला आहे. यामुळे महागाईची ओरड वाढली आहे. या स्थितीत डाळीचा दर मात्र स्थिरावस्थेत असताना केंद्र शासनाने डाळीशी संबंधित धान्यासाठी ‘स्टॉक लिमिट’ जाहीर केली आहे. याच्या निषेधार्थ राज्यातील मोठ्या कृषी बाजारपेठातील व्यवहार व्यापाऱ्यांनी बंद केले आहेत. हाच धागा पकडत जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ असलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ५ जुलैपासून खरेदी बंद करण्यात आली आहे. मार्केट यार्डातील अडत व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
...मग खरेदी कोणाच्या जिवावर करावी?
कळंबच्या आडत बाजारातील सौदे, खरेदी व विक्रीचे व्यवहार बार्शी, सोलापूर, लातूर येथील मोठ्या बाजारपेठवर निर्भर असतात. येथील खरेदीदार कळंबचा माल मोठ्या प्रमाणात घेतात. केंद्राच्या स्टॉक लिमिट धोरणामुळे पुढचे मोठे मोंढे बंद असल्याने आम्ही व्यवहार बंद ठेवत आहोत, असे निवेदन हणमंत राखुंडे, प्रवीण बलदोटा आदी व्यापाऱ्यांनी बाजार समितीला देत चार दिवसांपासून कळंबचा मोंढा बंद ठेवण्यात आला आहे.
काय आहे स्टॉक लिमिट?
लॉकडाऊन काळात डाळीचा दर वाढला होता. सध्या तो स्थिर आहे. यातच केंद्राने या डाळवर्गीय धान्यामध्ये मोडणाऱ्या मूग वगळता तूर, उडीद, मसूर, हरभरा आदी धान्याच्या स्टॉककरिता आगामी ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही साठवणूक मर्यादा लागू राहणार आहे. यात किरकोळ, ठोक, रिटेल व्यापाऱ्यांसह डाळ मिल मालकांना स्टॉक संदर्भात ठरावीक लिमिट दिलेली आहे.
प्रतिक्रिया
केंद्राने डाळीच्या दरासंदर्भात ‘स्टॉक लिमिट’ दिली आहे. यामुळे आमचा माल जातो, ती बार्शी, लातूरची बाजारपेठ बंद आहे. यामुळे आम्हीदेखील आमचे व्यवहार ठप्प ठेवले आहेत. सध्या खरेदी करीत नाहीत. स्टॉक लिमिटचा निर्णय आमच्यासारखे व्यापारी, शेतकरी यांच्यासाठी नुकसानकारक आहे.
- शंकर कोल्हे, आडत व्यावसायिक, कळंब.