मोबाईलने बिघडविले आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:13+5:302021-03-07T04:29:13+5:30
उस्मानाबाद : अलीकडे लहान मुले मैदानी खेळांपासून दूर जात असून कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे हे आणखी वाढले आहे. शाळा ...

मोबाईलने बिघडविले आरोग्य
उस्मानाबाद : अलीकडे लहान मुले मैदानी खेळांपासून दूर जात असून कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे हे आणखी वाढले आहे. शाळा बंद असल्याने घरातच बसून असलेली मुले ऑनलाईन शिक्षण आणि गेममध्ये अडकली असल्याचे चित्र घरोघरी पाहवयास मिळत आहे. यामुळे त्यांच्या डोळ्यांसह आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.
गतवर्षी २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू झाले होते. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शाळाही बंदच ठेवाव्या लागल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. तर २७ जानेवारीपासून ५ वी ते आठवीचे वर्ग शासनाच्या आदेशान्वये सुरू करण्यात आले आहेत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्ण वाढू लागल्याने चौथी पर्यंतचे वर्ग बंदच आहेत. शिवाय, इयत्ता पाचवीपुढील वर्गातील मुलांनाही पालक कोरोनाच्या धास्तीने शाळेस पाठविण्याऐवजी ऑनलाईन अभ्यास क्रमास प्राधान्य दर्शवित आहेत. वर्षभरापासून मुले मोबाईलवर अभ्यास करीत असतात. त्याचबरोबर बाहेरील मैदानी खेळ बंद असल्यामुळे अनेक मुले मोबाईलमधील गेमलाच प्राधान्य देत आहेत. परिणामी, मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मुलांच्या डोळ्यांचे आजार तसेच डोकेदुखीचा त्रासही जाणवू लागला आहे.
चौकट...
इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा बंद आहेत. शिवाय, इतर वर्गांमधील विद्यार्थ्यांही कोरोनामुळे शाळेकडे पाठ फिरवित आहेत. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर देत आहेत. अभ्यास संपल्यानंतर त्या मधील विविध मनोरंजन आणि मोबाईलमधील गेम खेळत असतात. यामधून मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
विटीदांडू गायब
मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खेळ अत्यंत गरजेचे आहेत. मोबाईलमुळे मुलांचे मैदानी खेळ नसल्यातच जमा झाले आहे. विटीदांडू, कबड्डी, मल्लखांब, नेमबाजी, गोळाफेक भालाफेक यासारखे विविध खेळ मोबाईलमुळे अडगळीला पडले आहेत. मुलांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खेळ आणि व्यायाम महत्त्वाचा आहे.
कोरोनामुळे गेम खेळण्याचे प्रमाण वाढले
कोरोनामुळे सर्व विद्यार्थी घरीच असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी चार भिंतींच्या आतमध्ये ठेवणे पालकांना सुरक्षित वाटते. यावेळेस मुले कंटाळू नयेत म्हणून त्यांच्या हाती मोबाईल दिला जातो. मात्र, अशावेळी इंनडोअर गेम खेळविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
कोट...
कोरोना काळात मोबाईलवरच ऑनलाईन अभ्यासक्रम होत आहेत. शिवाय मुले गेम खेळण्यातही मग्न असतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे जळजळ होणे, डोकेदुखी असे त्रास उद्भवू लागले आहेत.
डाॅ. अर्चना गोरे,
नेत्र रोग तज्ज्ञ
कोरोना काळात मुले घरातच आहेत. या काळात मुलांच्या हाती मोबाईल राहत असल्यामुळे मैदानी खेळांऐवजी व्हिडिओ गेम्स खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणामी मुलांच्या मानसिक आरोग्यावर पडत असून मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे.
डाॅ. महेश कानडे, मानसोपचारतज्ज्ञ