बाजारपेठा सुसाट, फिजिकल डिस्टन्सिंगचा बाेजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST2021-06-19T04:22:10+5:302021-06-19T04:22:10+5:30
उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने ७ जूनपासून निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले आहेत. बाजारपेठा दुपारी चार वाजेपर्यंत ...

बाजारपेठा सुसाट, फिजिकल डिस्टन्सिंगचा बाेजवारा
उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने ७ जूनपासून निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले आहेत. बाजारपेठा दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे. नागरिक खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडत असल्याने बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत आहे. एप्रिल महिन्यापासून बाधितांची संख्या वेगाने वाढू लागल्याने एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे तब्बल दोन महिने बाजारपेठ बंद होती. जून महिन्यात रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने ७ जूनपासून निर्बंध काहीअंशी शिथिल केले असून, दुपारी चार वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, खाद्यदुकाने, कृषी उत्पादनाशी संबंधित दुकाने, पावसाळ्यासंबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज दुपारी ४ पर्यंत सुरू राहत आहेत. बाजारपेठ उघडताच नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळते. बाजारपेठेत गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडतो. मात्र, अनेक नागरिक सध्या बाजारपेठेत मास्कचा वापर करताना आढळून येतात.
देशपांडे स्टॅन्ड भाजी मंडई
सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक शहरातील देशपांडे स्टॅन्ड परिसरातील भाजी मंडईत जात असतात. या ठिकाणी विक्रेते मास्क लावून तसेच फिजिकल डिस्टन्स ठेवून व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. मात्र, ग्राहक फिजिकल डिस्टन्स न ठेवता मंडईत गर्दी करताना आढळून येतात.
बार्शी नाका भाजी मंडई
शहरातील बार्शी नाका परिसरातील रस्त्यालगत सकाळी भाजी व फळ विक्रेते भाजी विक्रीसाठी बसत असतात. या ठिकाणी शहरातील नागरिक भाजी खरेदीसाठी येतात. या ठिकाणीही ग्राहकांकडून नियमांचे पालन केले जाताना दिसत नाही.
बसस्थानकही गजबजले
७ जूनपासून शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून बसेस धावू लागल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची रेलचेल वाढली आहे. स्थानकात येणारे प्रवासी मास्कचा वापर करताना आढळून येतात. तसेच सॅनिटायझरचा वापरही केला जातो. मात्र, स्थानकात फिजिकल डिस्टन्सिंग राखले जात नाही.
दुकानदारांचे दुर्लक्ष
बाजारपेठेतील किराणा, कापड, भाजीपाला दुकानांसमोर ग्राहक गर्दी करीत असतात. दुकानासमोर गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी दुकानदारांची आहे. मात्र, अनेक ठिकाणी दुकानांसमोर गर्दी झालेली असतानाही दुकानचालक ग्राहकांना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबत सांगताना आढळून येत नाहीत. शिवाय, ग्राहकांनाही कोरोना विषाणूचे भय राहिले नसल्याचे दिसून येते.
विक्रेतेही बेफिकीर
मास्कविक्रीच्या स्टॉलवर कुणीही यावे, मास्क हाताळावा आणि पुढे जावे, अशी अवस्था बाजारपेठेत फिरल्यावर दिसून येते. मास्कला हात न लावण्याची सूचना देणे गरजेचे होते. मात्र, कोरोनाबाबत बेफिकिरी असलेला विक्रेता देत नव्हता. त्यामुळे बेजबाबदार ग्राहकदेखील खुशाल मास्क हाताळत परत निघून जात होते.
रोज शेकडो नागरिकांवर कारवाया
कोविड-१९ संसर्गास आळा बसावा, यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या शेकडो नागरिकांवर पोलिसांकडून कारवाया करून २० ते २५ हजारांचा दंड वसूल केला जात आहे. असे असतानाही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.