वाशी : सासरच्या मंडळींनी वडिलांकडून ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून छळ केल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद मयताच्या पित्याने वाशी पोलिसांत दिली. यावरून सासरच्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील दिलीप किसन पवार यांची मुलगी मीना ऊर्फ गुड्डी (वय १९) हिने २३ नोंव्हेबर २०२० रोजी गावातील शुभम बापू कवडे याच्याबरोबर विवाह केला होता. एक महिना सासरच्या मंडळीने चांगले सांभाळले. मात्र, नंतर पैशासाठी तिचा छळ सुरू केला. याला कंटाळून तिने वाशी येथील वर्तक चौकात सासऱ्यांच्या घरी १९ जानेवारी रोजी गळफास लावून आत्महत्या केली, अशी तक्रार मयत विवाहितेचे वडील दिलीप किसन पवार यांनी दिली. यावरून मयताचे पती शुभम बापू कवडे, सासरे बापू चंद्रकांत कवडे, सासू वैशाली बापू कवडे, चुलत सासरे विलास चंद्रकांत कवडे, नणंद नेहा व निकिता बापू कवडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
हॉटेलात चोरी
पेठसांगवी : येथील एका हॉटेलचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील बिस्कीटे व इतर खाद्यपदार्थ चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. येथील बसस्टॉपजवळ हॉटेल ज्योतिर्लिंगमध्ये ही चोरी झाली. सकाळी हॉटेलचे मालक हॉटेल उघडण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले.