प्रगती बघवत नाही, म्हणून मनीष शिसोदियांना अटक; आपकडून धाराशिवमध्ये निषेध
By चेतनकुमार धनुरे | Updated: February 27, 2023 18:21 IST2023-02-27T18:20:53+5:302023-02-27T18:21:05+5:30
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून सीबीआयने त्यांना रविवारी अटक केली.

प्रगती बघवत नाही, म्हणून मनीष शिसोदियांना अटक; आपकडून धाराशिवमध्ये निषेध
धाराशिव : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांना सीबीआयने गैरव्यवहाराच्या आरोपावरून अटक केली आहे. या कृतीचा धाराशिवमध्ये आप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सोमवारी निषेध केला. पक्षाची लोकप्रियता तसेच नागरिकांची प्रगती बघवत नसल्यानेच हे कृत्य केल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर केला.
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून सीबीआयने त्यांना रविवारी अटक केली. हा प्रकार केंद्र सरकारच्या सांगण्यावरूनच झाल्याचा दावा करीत सोमवारी आप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उस्मानाबादेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक येत निषेध नोंदविला. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे म्हणाले, देशाची प्रगतीचे दार हे शिक्षणातून खुलते, याची जाणीव ठेवून दिल्लीतील देशाच्या भविष्याला चांगल्या पद्धतीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम मनीष शिसोदिया यांनी केले. त्याचे सर्वत्र कौतुकही होत आहे.
यासोबतच पक्षाची प्रतिमा देशभर लोकप्रिय झाली आहे. ही प्रगती बघवत नसल्यानेच केंद्र सरकारने सीबीआयसारख्या यंत्रणेला हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे. या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. अशाच पद्धतीने जर केंद्र सरकार देशाची प्रगती रोखणार असेल तर आम्हीही त्यांना पुन्हा संसदेत जाण्यापासून रोखण्याची शपथ घेत असल्याचेही माकोडे म्हणाले. याप्रसंगी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.