बाबूराव चव्हाण
उस्मानाबाद : एकीकडे शहरीकरणामुळे भाैतिक सुविधांची रेलचेल असताना ग्रामीण भागात अद्याप आराेग्याचे प्रश्न गंभीर आहेत. यातूनच कुपाेषणासारख्या समस्येचा जन्म हाेताे. हा कलंक पुसण्यासाठी शासनाकडून विविध उपायाेजना केल्या जातात. त्याचे सकारात्मक परिणाम २०१९-२० च्या राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्वेक्षण अहवालातून समाेर आले आहेत. कुपाेषित बालकांचे प्रमाण ४३.३ वरून ३७.२ टक्क्यांपर्यंत (वयानुसार उंची नसणे) खाली आले आहे, तसेच कमी वजनाच्या बालकांचे प्रमाणही ४४.५ वरून ३२.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. हे चित्र जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना आणखी बळ देणारे आहे.
राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्वेक्षण दर पाच वर्षांनी केले जाते. चाैथे सर्वेक्षण २०१५-१६ मध्ये झाले हाेते. त्यानुसार कुपाेषणाची मगरमिठी घट्ट झाल्याचे समाेर आले हाेते. यानंतर बालकांतील हे कुपाेषण कमी करण्यासाठी शासन स्तरावरून महिला व बालकल्याण विभाग, आराेग्य यंत्रणेच्या माध्यमातून विविध उपायाेजना हाती घेण्यात आल्या, तसेच २०१८ मध्ये उस्मानाबादचा समावेश मागास जिल्ह्यांच्या यादीत झाल्यानंतर ‘आराेग्य’ या घटकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याचे सकारात्मक चित्र २०१९-२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणातून समाेर आले आहे. २०१५-१६ च्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात वयाच्या प्रमाणात उंची नसलेल्या ५ वर्षांखालील बालकांचे प्रमाण ४३.३ टक्के एवढे हाेते. सध्या हे प्रमाण ३७.२ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्याचप्रमाणे वयाच्या प्रमाणात वजन नसलेली बालकांचे प्रमाण ४४.५ टक्के हाेते. ते आता ३२.५ टक्के म्हणजेच साडेबारा टक्क्यांनी केली झाले आहे. अतितीव्र कुपाेषित (उंचीच्या प्रमाणात वजन नसणे) बालकांचे प्रमाणही ९.१ वरून ५.५ पर्यंत कमी झाले आहे. समाेर आलेले हे सकारात्मक चित्र आराेग्य यंत्रणेसह महिला व बालकल्याण विभागाचा आत्मविश्वास वाढीस लावणारे ठरू शकते.
चाैकट....
अतिवजनाचीही समस्या
सुरुवातीच्या काळात कमी वजनाच्या बलकांना कुपाेषित म्हटले जात हाेते; परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे कुपाेषण वेगवेगळ्या प्रकारात समाेर येऊ लागले आहे. आता अतिवजनाच्या बालकांची गणनाही कुपाेषित बलकांमध्ये केली जात आहे. २०१५-१६ च्या तुलनेत हेही प्रमाण कमी झाले आहे. तेव्हा २.२ टक्के बालके ‘ओव्हरवेट’ हाेती. २०१९-२० मध्ये हे प्रमाण काहीअंशी कमी हाेऊन १.८ टक्के झाले आहे. शहरांसाेबतच आता ग्रामीण भागातही ‘ओव्हरवेट’ची समस्या भेडसावू लागली आहे.
काेट...
राज्य तसेच केंद्र सरकारच्या वतीने कुपाेषण कमी करण्यासाठी विविध उपायाेजना हाती घेण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर नीती आयाेगाच्या माध्यमातूनही या घटकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले हाेते. त्याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. कुपाेषणाची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. येणाऱ्या काळात कुपाेषण निर्मूलनाच्या अनुषंगाने आणखी जाेरदार प्रयत्न केले जातील.
-बळीराम निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
जिल्ह्यात कुपाेषणाची तीव्रता काहीअंशी कमी झाली आहे; परंतु ॲनिमियाने चिंता वाढविली आहे. या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून आगामी काळात ठाेस पावले उचलली जाणार आहेत.
-डाॅ. हनुमंत वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी, जिल्हा परिषद
पाॅइंटर...
दृष्टिक्षेपात कुपाेषण....
कुपाेषणाचा प्रकार २०१५-१६ २०१९-२०
वयानुसार उंची नसणे - ४३.३ टक्के ३७.२
वजनानुसार उंची नसणे २१.९ १६.१
अतितीव्र कुपाेषित ९.१ ५.५
वयानुसार वजन नसणे ४४.५ ३२.५
ओव्हरवेट २.२ १०८