वाहता झाला ‘नर-मादी’, पर्यटकांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST2021-09-12T04:37:09+5:302021-09-12T04:37:09+5:30
सन १३५१ ते १४८० दरम्यान बहमनी राजाच्या काळात हा किल्ला बांधला गेला. अनेक आक्रमणे, रक्तरंजित क्रांती, तलवारीचा खणखणाट, तोफांचा ...

वाहता झाला ‘नर-मादी’, पर्यटकांना भुरळ
सन १३५१ ते १४८० दरम्यान बहमनी राजाच्या काळात हा किल्ला बांधला गेला. अनेक आक्रमणे, रक्तरंजित क्रांती, तलवारीचा खणखणाट, तोफांचा कर्णभेदी आवाज व विरांचे साहस या किल्ल्याने अनुभवल्या आहेत. हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या निसर्गाच्या सान्निध्यात व डोंगरमाथ्यावर असला तरी शत्रूला तो सहजासहजी सर करता येत नाही. मात्र, किल्ल्यातून परिसरातील दोन किलोमीटर अंतरावरील शत्रू सहज टिपता येतो. याकरिता किल्ल्यात टेहळणी करण्यासाठी १५० फूट उंचीचे उपली बुरूज बांधलेले असून, या बुरुजावरून ३६० अंशामध्ये शत्रूवर तोफांचा मारा करता येईल अशी रचना केलेली आहे. या किल्ल्याच्या तटभिंती दुहेरी असून, रुंद व उंच आहेत. तटभिंतीची एकंदरीत लांबी जवळपास तीन किलोमीटर असून त्यावर ११४ बुरूज बांधलेले आहेत. शिवाय पसरट व खोल असे जलयुक्त खंदक तयार केलेले आहेत. बहमनीच्या अस्तानंतर १४८१ मध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या अधिपत्याखाली आला. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ असून या ठिकाणी सैनिकांना युद्ध प्रशिक्षण दिले जात होते. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रणमंडळ आणि पाणीमहल होय. १५५८ मध्ये द्वितीय अली आदिलशहाच्या काळात मीर इमादीन या वास्तूतज्ज्ञाने पाणी महाल बांधून प्राचीन स्थापत्य अभियांत्रिकी कलेचे उत्तम दर्शन घडविले आहे. येथील धबधबाही आता पावसामुळे प्रवाही झाला असून, पर्यटकांचा ओघ चांगलाच वाढू लागला आहे.
अशी आहे धबधब्याची रचना...
रणमंडळ व किल्ला यामध्ये असलेल्या खंदकाची खोली वाढवून त्यात बोरी नदीचा प्रवाह सोडला आहे. खंदकात बारामाही पाणी साठून राहावे याकरिता एक बंधारा बांधलेला आहे. यालाच पाणीमहल बंधारा म्हणतात. या बंधाऱ्याची उंची व रुंदी जवळपास २० मीटरपेक्षा जास्त आहे. बंधाऱ्याच्या पोटात थंड हवेचे पाणीमहाल बांधले असून, येण्या-जाण्यासाठी पायऱ्याचा मार्ग बनवलेला आहे. या बंधाऱ्यावर खंदकात साठलेले जास्तीचे पाणी बाहेर सोडण्यासाठी दोन सांडवे सोडण्यात आले आहेत. या सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या विसर्गालाच नर-मादी धबधबा असे संबोधले जाते. जेव्हा खंदकातील पाणी वाढते, बोरी नदीला पूर येतो, तेव्हा नर-मादी धबधब्यातून जवळपास ८० फूट उंचीवरून पाणी खाली दरीत कोसळते. हे विलोभनीय दृश्य नयनी साठविण्यासाठी पर्यटक दूरदूरवरून येऊ लागले आहेत.